सहा दिवसांत २१२ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:35 AM2019-05-13T00:35:41+5:302019-05-13T00:36:32+5:30
सहा दिवसांत ई-चालानद्वारे २१२ जणांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की, पोलिसांच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जातो. यामुळे यात पारदर्शकता आणण्यासाठी गृहविभागाने ई - चालान पद्धती सुरु करण्याचा निर्णय घेतला. जालना शहरात मंगळवारपासून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून, मागील सहा दिवसांत ई-चालानद्वारे २१२ जणांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रस्त्यावर धावतांना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. यामुळे गृहविभागाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कागदी चालान बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची जरब वाढणार आहे. यापूर्वीच काही जिल्ह्यात एक राज्य एक ई -चालान प्रणालीव्दारे वाहतूक शाखा स्मार्ट झाल्या होत्या. मात्र, जालना जिल्ह्यातील अंमलबजावणी खोळंबली होती. गृह विभागाने वाहतूक शाखेला पत्र पाठवून याविषयी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना केल्या. यामुळे जिल्ह्यातील ७७ पोलीस कर्मचाऱ्यांना या मशिनविषयी प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर मंगळवारी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या हस्ते सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रणालीसाठी एम- स्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. मोबाईलसारखी ही मशिन आहे. त्याला ब्लूटूथने प्रिंटर जोडले आहे. या पध्दतीमुळे चोरीचे वाहन, चालकाचा परवाना याची माहितीही तत्काळ मिळणार आहे. दंडाची रक्कम थेट अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेकडे जमा होणार आहे. मागील सहा दिवसात वाहतूक शाखेने २१२ जणांवर ई-चालनाद्वारे कारवाई केली आहे. यात मंगळवारी १९, बुधवारी २६, गुरुवारी ४८, शुक्रवारी ५४, शनिवारी ६५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
भ्रष्टाचारास बसणार चाप
वाहतुकीला शिस्त लावताना वाहनांवर विविध नियमानुसार दंड आकारला जातो. अनेकदा हा दंड अवास्तव असल्याची ओरड होते. दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की नाही, याबाबत संशय घेण्यात येतो. यात पादर्शकता यावी या उद्देशाने ई-चालान प्रणाली सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
फाडलेल्या चालानवर शासकीय नियमानूसार दंडाची रक्कम राहणार आहे. ती रक्कम अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेला तत्काळ नोंदविली जाणार आहे.