चालकांवर कारवाई; मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:46 AM2019-12-17T00:46:43+5:302019-12-17T00:46:59+5:30
वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तीन वाहन चालकांविरूध्द वाहतूक शाखेने सोमवारी कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तीन वाहन चालकांविरूध्द वाहतूक शाखेने सोमवारी कारवाई केली. या प्रकरणी तीन चालकांविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील वाहतुकीला मोठा अडथळा ठरणाºया मोकाट जनावरांविरूध्द वाहतूक शाखा, पालिकेचे पथक कारवाई करणार कधी, असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे.
शहर वाहतूक शाखेकडून सोमवारी वाहतुकीला अडथळा करणाºया वाहन चालकांविरूध्द कारवाईची मोहीम राबविण्यात आली. शहरातील औरंगाबाद रोडवरील विशाल कॉर्नरवर तीन वाहने रहदारीस अडथळा होईल, अशा पध्दतीने उभी होती. या वाहनांवर वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश भाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली. जावेद शेख अहमद अली, नारायण सुखदेव पौळ, भरत दगडू अवधूत या तिघांविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश भाले, पोना रवींद्र आढाव, पोकॉ भगवान नागरे, विनोद सरदार आदींनी केली.
शहरातील बाजारपेठेसह अंतर्गत भागातील रस्त्यांवर ठाण मांडणाºया मोकाट जनावरांवर कारवाईसाठी बैठकांचे सत्र झाले. नगर पालिकेच्या सभागृहात हा मुद्दा गाजला. मात्र, वाहतूक शाखा आणि पालिकेच्या संयुक्त पथकाने नंतर कारवाईची विशेष मोहीम हाती घेतल्याचे दिसत नाही. किरकोळ कारवाई करून वेळ मारून नेला जात असून, रस्त्यावर मोकाट जनावरांचे ठाण कायम आहे. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून, चालकांना विशेषत: महिला, बालकांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांविरूध्दची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.