आदर्श शिंदेनी जिंकली मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:38 AM2019-01-23T00:38:32+5:302019-01-23T00:39:09+5:30
जालन्यात तीन दिवसीय भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या फेस्टिव्हलची सांगता प्रसिध्द गायक आदर्श शिंदेच्या बहारदार भीम गीतांनी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या पुढाकाराने तीन दिवसीय भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या फेस्टिव्हलची सांगता प्रसिध्द गायक आदर्श शिंदेच्या बहारदार भीम गीतांनी झाली. यावेळी आदर्श शिंदेंची व्यासपीठावर उपस्थिती होताच, त्यांचे टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत जालनेकर रसिकांनी केले.
प्रारंभी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आदर्श शिंदेचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अॅड. बी.एम. साळवे, सुधाकर निकाळजे, एन.डी. गायकवाड, बबनराव रत्नपारखे, गणेश रत्नपारखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी सोनियाची उगवली सकाळ...जन्मास आले भीमराव, विज्ञानाचा निर्मळ झरा.. भीमा सारखा माणूस खरा.. जन्मा येईल काय, माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का, यासह अन्य भीम गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित रसिकांनी शिंदेंच्या गायकीला टाळ्यांचा तेवढाच प्रतिसाद देत त्यांचा उत्साह वाढविला. अनेक गाण्यांना वन्समोअर करण्यात आल्याने अंबड चौफुलीचा परिसर भीम गीतांनी न्हाऊन निघाला. हा भीम महोत्सव आम्ही दरवर्षी भरवू, अशी घोषणा यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. तसेच तीन दिवसांच्या या भीम महोत्सवात झालेल्या कार्यक्रमांना रसिकांनी जो प्रतिसाद दिला, तो प्रेरणादायी होता.