कुंभार-पिंपळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू करून आठवडी बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, अशाही स्थितीत कुंभार-पिंपळगाव येथे बुधवारी आठवडी बाजार भरविण्यात आला होता. विशेष म्हणजे बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतराच्या नियमाला तिलांजली दिल्याचे दिसून आले.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार-पिंपळगाव येथे प्रशासकीय सूचनांकडे दुर्लक्ष करून बुधवारी आठवडी बाजार भरविण्यात आला होता. बाजारात येणाऱ्या ग्राहकांनीही कोरोनातील सूचना पायदळी तुडवीत एकच गर्दी केली होती. सकाळी मुख्य रस्त्यावर दुकाने थाटली होती. नंतर मात्र ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, उपसरपंचांनी विनंती केल्याने सूचनांचे पालन करून आठवडी बाजार भरविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बाजार भरविण्यात आला होता. मात्र, अनेकांनी ना मास्कचा वापर केला ना सुरक्षित अंतराचे पालन केले. गावातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणांवर गर्दी होत असल्याचेही दिसून आले. याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.