आरोग्य विभागाचे सर्व प्रश्न सुटतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:59 AM2020-01-13T00:59:01+5:302020-01-13T00:59:07+5:30
आरोग्य विभागासंदर्भात असलेले प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोडवतील, असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा रुग्णालयासह जिल्हा आरोग्य विभागाचे काम चांगले सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या विविध विभागांचा रुग्णांना लाभ मिळणार असून, आरोग्य विभागासंदर्भात असलेले प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोडवतील, असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा आरोग्य विभागाची विशेष बैठक घेऊन चर्चा करण्यासंदर्भातही त्यांनी सूचना दिल्या.
जिल्हा रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या केमोथेरपी युनिट, नवीन सी. टी. स्कॅन यंत्रणा, डीईआयसी, सोलार सिस्टीम, विभागीय कौशल्य प्रशिक्षण केंद्र, औषधी भांडार, परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन खा. सुप्रिया सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आ. कैलास गोरंट्याल, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहायक उपसंचालक डॉ. भटकळ, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निमा आरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुळे यांनी आपल्या धावत्या दौऱ्यात उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
जालना जिल्हा रूग्णालयासह आरोग्य विभागाचे काम चांगले सुरू आहे. या रुग्णालयात सुरू झालेल्या विविध विभागांमुळे रुग्णांना चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे हे काम पाहत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचा-यांची एक स्वतंत्र बैठक लावावी, त्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत, बैठकीला आपल्यालाही निमंत्रीत करावे, अशा सूचनाही खा. सुळे यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, उपस्थित मान्यवरांचे रुग्णालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महिला कर्मचा-यांसमवेत काढले सेल्फी
खा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हा रुग्णालयात आगमन झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, यावेळी दूर उभ्या असलेल्या परिचारिकांसमवेत आणि कार्यक्रमास उपस्थित आशा कार्यकर्ती, महिलांसमवेत स्वत: खा. सुळे यांनी सेल्फी काढून घेतले. तसेच महिलांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. हा प्रसंग परिचारिकांसह आशा कार्यकर्तींसाठी सुखद धक्का होता.