३६ हजार कामगारांना १२ कोटी रुपयांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:35 AM2019-08-11T00:35:05+5:302019-08-11T00:35:33+5:30
बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना आठ वर्षात साहित्य खरेदीसाठी १२ कोटी ६२ लाख ५२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना आठ वर्षात साहित्य खरेदीसाठी १२ कोटी ६२ लाख ५२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होत आहे.
बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी २८ विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामध्ये इमारत बांधकाम कामगार, दगडकाम, रंगकाम, सुतारकाम, लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्याचे काम, सुरक्षा उपकरण, जलसिंचन, काचेच्या संदर्भात काम, अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्रिशियन तसेच विद्युत काम, विटांचे तसेच कौलारु काम, सौरउर्जेशी निगडीत, वातानुकूलित यंत्र दुरुस्ती, कामगारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती यासह २८ प्रकारचे काम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. १८ ते ६० या वयोगटातील कामगारांनी २०११ ते २०१९ पर्यंत येथील कामगार मंडळात ६० हजारांपेक्षा जास्त कामगारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३६ हजार कामगार जीवित आहेत. कामगारांना विविध कामे करताना लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नोंदणीकृत कामगारांना कामगार मंडळाच्या वतीने २०१४ पर्यंत ३ हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्यात येत होते. वाढत्या महागाईमुळे शासनाने २०१८ पासून २ हजार रुपयांची वाढ करुन अनुदान ५ हजार रुपये प्रति कामगार केले. याचा फायदा कामगारांना व्हावा यासाठी जिल्ह्यात अनेक वेळा नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे. तसेच दररोज येथील कार्यालयात ७०० कामगारांची नोंदणी होत असल्याची माहिती आहे. मात्र येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने अर्जाची छाननी, अनुदान वेळेत मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत.
येथील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात कामगार अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकरी, वेतन अधिकारी, सुविधाकार, कनिष्ठ लेखापाल, डेटा एट्री आॅपरेटर, लिपिक- टंकलेखक, शिपाई अशी १८ पदे मंजूर आहेत.
यापैकी एक कामगार अधिकारी दोन शिपाई आदी पदे भरण्यात आली असून उर्वरित पदे रिक्त आहेत. अनेक कामे कंत्राटी कर्मचाºयांव्दारे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दररोज ७०० कामगारांची नोंदणी होेते. कर्मचाºयांच्या रिक्त पदांमुळे विविध कामांना विलंब होत असल्याची ओरड होत आहे.