शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आदर्श ग्रामसंसद योजनेंतर्गत तालुक्यातील अंबा हे गाव पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दत्तक घेतले आहे. गत अडीच वर्षांत गावात विविध योजनांतून सव्वा कोटींचा निधी मिळाला असून, याद्वारे अनेक विकास कामे झाल्यामुळे गावाचे रुपडे पालटले आहे.अंबा हे गाव परतूर शहरापासून ३ कि़मी. अंतरावर आहे. या गावाची लोकसंख्या ५ हजार ३०० आहे. गावाच्या विकासासाठी आजपर्यंत १ कोटी २५ लाखांचा निधी आला आहे. गावात पूर्ण हगणदारीमुक्त होऊन वैयक्तिक १७४ शौचालयाची कामे पूर्ण करण्यात आली. या गावात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबवून पाण्याची टाकी, अंतर्गत पाईपलाईन, विहीर घेण्यात आल्याने या गावाचा पाणीप्रश्न सुटला आहे. गावात सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक नाल्या बांधण्यात आल्या. गावात एलईडी लाईट बसविण्यात आले. गावातील मुख्य चौकात हायमॅक्स लाईट बसविण्यात आले. ग्रा.पं. कार्यालयाची नवीन व भव्य इमारत उभारण्यात आली. कार्यालयात फर्निचर करण्यात आले. गावाच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी सीसी बंधारे घेण्यात आले. शेतकऱ्यांना १० सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला आहे. शुद्ध पाणी प्रकल्प उभारण्यात आला आहे. कार्यालय परिसरात पेवरब्लॉक बसविण्यात आले. भूमिगत गटार योजना राबवून गाव दुर्गंधीमुक्त करण्यात आले. स्मशानभूमीचे बांधकाम करून गायरान जमिनीत वृक्षारोपन करण्यात आले. गावात सी.सी. रोड करून कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. गावाच्या बाहेरून ४०० मीटरचा डांबरी रिंगरोड करण्यात आला. नाल्याचे खोलीकरण, तारा फिनिशिंग, झाडांसाठी पाईपलाईन करून गावात शंभर घरपट्टी, नळपट्टी भरणाºयांना गिरणीतून मोफत दळणही देण्यात येते. या गावाचा आगामी काळात सर्वांगीण विकास करण्यात येईल, असे सरपंच दीपाली बोनगे यांनी सांगितले.