जाफराबाद : तालुक्यातील पिंपळखुटा, देऊळगाव उगले, भराडखेडा येथील चार शेतकऱ्यांची ११ जनावरे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. एकाच रात्री ११ जनावरे चोरी गेल्याने पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, एका वर्षात जनावरे चोरी जाण्याची ही चौथी घटना आहे. पोलिसांना अद्याप एकाही घटनेचा तपास लावता आला नाही.
जाफराबाद शहरापासून अवघ्या ४ कि.मी. अंतरावर असलेल्या पिंपळखुटा व देऊळगाव उगले शिवारात शेतकरी सुरेश कणखर यांचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी गोठ्यात दोन बैल बांधले होते. चोरट्यांनी मध्यरात्री दोन बैल चोरून नेले, तर प्रकाश दूनगहू यांचा एक बैल, भराडखेडा येथील समाधान गणपत गावंदे यांची दोन पिलांसह बकरी व नितीन गावंदे यांची बैलजोडी व एक गाय, अशी ११ जनावरे चोरी गेली आहेत. विशेष म्हणजे, शेतकरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, बीट जमादारने तक्रार न घेता, परिसरातच जनावरांचा शोध घेण्याचा सल्ला दिला, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकरी विविध संकटांचा सामना करीत असतानाच आता जनावरे चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
एकाच वर्षात २४ जनावरे चोरी : पोलिसांना शोध लागेना
तालुक्यात गेल्या वर्षभरापासून जनावरे चोरीचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील सिपोरा अंभोरा, कुंभारी, बोरी, बोरगाव फदाट येथून मोठ्या प्रमाणात जनावरे चोरी गेले आहेत. तालुक्यात आतापर्यंत २४ जनावरे चोरीस गेली असून, पोलिसांना एकाही प्रकरणाचा शोध लावता आला नाही. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.