जालना : भूखंड कराराचा भंग केल्याप्रकरणी महावीरप्रसाद रतनलाल अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन अनुजकूमार श्रीनिवास सारस्वत याच्या विरुध्द गुरुवारी रात्री फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास कदीम पोलिसांनी त्याला अटक केली.
महावीरप्रसाद अग्रवाल आणि अनुज सारस्वत यांच्यात जालना येथील सर्वे क्र. ३८६, ३८९ मधील तुळजाभवानी मंदिर परिसरातील सहान प्लॉट क्र. १, २ आणि ३ ज्याचे क्षेत्र ३०५,३०० असे एकूण ६०५ चौरस मीटर जागेच्या संदर्भात करारनामा झाला होता. त्यानुसार एकूण रक्कम १ कोटी ३७ लाख ४० हजार रुपयांत कायम विक्री करण्याचा करार (इसारपावती) १०० रुपयाच्या बॉण्डवर ३१ मार्च २०१५ करुन घेतली होती. त्यावेळी इसारापोटी १ कोटी २१ लाख रुपये अग्रवाल यांना देण्यात आले.
मात्र, उवर्रित रक्कम सारस्वत यांनी करारानुसार दिली नाही. तसेच हा प्लॉट एका बँकेस गहाण ठेवून त्यावर अंदाजे ४ कोटी रुपयांचे कर्जही उचलले आहे. एकूणच या सर्व व्यवहारास अनुजकुमार सारस्वत यांची संशयास्पद भूमिका असल्याचे महावीरप्रसाद अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पोलिसांनी अनुजकुमार सारस्वत याला अटक केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.