जालना पालिकेच्या २६४ कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:01 AM2019-01-15T01:01:49+5:302019-01-15T01:02:08+5:30
जालना पालिकेच्या आगामी वर्षासाठीच्या अर्थ संकल्पावर सोमवारी जालना पालिकेच्या स्थायी सभेत साधक-बाधक चर्चा करण्यात येऊन त्याला मान्यता देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना पालिकेच्या आगामी वर्षासाठीच्या अर्थ संकल्पावर सोमवारी जालना पालिकेच्या स्थायी सभेत साधक-बाधक चर्चा करण्यात येऊन त्याला मान्यता देण्यात आली. जवळपास २६४ कोटी रूपयांचे हे अंदाजपत्रक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी हे अंदाजपत्रक स्थायीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर केले.
यावेळी स्थायी समितीचे पदसिध्द सदस्य तथा उपनगराध्यक्ष राजेश राऊत, स्थायी समिती सदस्य भास्कर दानवे, रमेश गौरक्षक, गणेश राऊत, अशोक पांगारकर, सोनाली चौधरी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांच्यासह अन्य विभागप्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी अंदाज पत्रकातील तरतुदींंवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन हे अंदाजपत्रक आगामी सर्वसाधारण सभेत ठेवून त्याला मंजुरी मिळवण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पासह जालना ते पैठण या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे व्हॉल्व फोडून त्यातून हजारो लिटर पाण्याची चोरी होत आहे.
ही चोरी रोखण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करून रात्रीची गस्त घालण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यावरही चर्चा करण्यात आली.
यावेळी शहरातील स्वच्छता, मालमत्ता कराची वसुली, वीजुपरवठा आदी मुद्यांवरही चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. लवकरच अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी पुढील महिन्यात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येऊन त्यात हे अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे.