अफूची शेती करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:59 AM2019-03-06T00:59:48+5:302019-03-06T00:59:58+5:30
जाफराबाद तालुक्यातील काळेगाव येथील शेतकऱ्याने पिकविलेल्या अफूच्या शेतावर पोलिसांनी मंगळवारी अचानक छापा टाकून दहा ते बारा लाख रूपयांची अफूची झाडे जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन/जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील काळेगाव येथील शेतकऱ्याने पिकविलेल्या अफूच्या शेतावर पोलिसांनी मंगळवारी अचानक छापा टाकून दहा ते बारा लाख रूपयांची अफूची झाडे जप्त केली.
भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांना काळेगावातील एका शेतकऱ्याने अफूची लागवड केली असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून जायभाये यांनी मंगळवारी दुपारी आपल्या खास खब-याला शेतावर जाऊन आफुच्या झाडाचे फोटो मागविले. मिळालेली माहिती खरी निघाली. नंतर पोलीस अधीक्षक एस़चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, जाफराबादचे सहायक पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे, टेंभुर्णीचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, नायब तहसीलदार बीक़े.चंदन, पोलीस कर्मचारी शेख आसेफ, रामेश्वर शिनकर, गणेश पायघन, जगदीश बावणे, तलाठी अभय देशपांडे, कृषी सहायक देवानंद घुगे, यांनी टेंभुर्णीहून खळेगाव ते कल्याण गव्हाण रस्त्यावरील सोपान शेषराव चव्हाण यांच्या गट क्रमांक १७० शेतात जाऊन छापा टाकला असता, त्या ठिकाणी अर्धा एकर क्षेत्रामध्ये अफूची लागवड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या शेतक-याने अफूच्या बोंडांना चिरा मारून अफू काढून घेऊन अफूची सोंगणी केल्याचेही आढळून आले. यातून ४ ते ५ क्विंटल अफूची झाडे या ठिकाणी आढळून आली. त्यात खसखस देखील आढळून आली आहे.
सोपान चव्हाण या शेतक-याने दोन ते तीन महिन्यापूर्वी विदर्भाच्या सीमेवर असलेल्या गट क्रमांक १७० मध्ये अर्धा एकर क्षेत्रामध्ये अफूची लागवड केल्याने त्याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती, मात्र अफूचे झाड बोंडामध्ये आल्यावर त्याचा सर्वत्र सुगंध पसरतो त्यामुळेच ही अफूची झाडे आहेत. असे एकाच्या लक्षात आल्यावर एकाने थेट जायभाये यांना माहिती दिली. या माहितीची खात्री केल्यावर जायभाये व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी चव्हाणला अटक केली.