घराच्या वादातून प्राणघातक हल्ला; आठ आरोपींना सात वर्ष सश्रम कारावास
By दिपक ढोले | Published: September 11, 2023 06:38 PM2023-09-11T18:38:45+5:302023-09-11T18:39:46+5:30
सरकार पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले.
जालना : घराच्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या आठ आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. जावेद हमीद पठाण, किरण भुंजगराव कड, शेरू अफसर खान, आशाबाई तुकाराम जाधव, तुकाराम जाधव, श्रीकांत रूषीकुमार ताडेपकर, अक्कू ऊर्फ शेख अकीम शेख रहिम, अजय श्रीसुंदर (सर्व रा. जालना) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी वच्छलाबाई व आरोपी तुकाराम जाधव, आशाबाई जाधव यांचा घराचा वाद सुरू होता. १ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आरोपी श्रीकांत ताडेपकर हा गच्चीवर जात असताना फिर्यादीने त्यास विचारले असता, दोघांमध्ये बाचाबाची झाली नंतर सर्व आरोपी हातात लोखंडी रॉड, तलवार व सत्तूर घेऊन आले. नंतर सर्वांनी मिळून वच्छलाबाई, राजू मुख्यदल, सुचित्रा मुख्यदल, संजय मुख्यदल, अनिता मुख्यदल यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, जखमी साक्षीदार, डॉक्टर संदीप जाधव, डॉ. सचिन बेधमुथा, सपोनि. किरण बिडवे, पोलिस उपनिरीक्षक श्रीमंत यादव ठोंबरे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने आलेला साक्षीपुरावा व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एम. जैस्वाल यांनी आठही आरोपींना सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. ए. डी. मते व बी. के. खांडेकर यांनी काम पाहिले.