लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : कारवाईसाठी आलेल्या तहसीलदारांच्या पथकाच्या वाहनासमोर टेम्पो नेऊन पथकाच्या वाहनास कट मारून पळवून नेण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास टाकळखोपा- इंचा- शिरपूर पाणंद रस्त्यावर घडली असून, या प्रकरणी तिघांविरूध्द मंठा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून टाकळखोपा येथील ४ ते ६ टॅम्पोधारक अवैध वाळू उपसा, वाहतूक करीत असल्याची माहिती मंगळवारी रात्री मंठा येथील तहसीलदार सुमन मोरे, तलाठी नितीन चिंचोले व संदीप आदेवाल यांना मिळाली होती. माहिती मिळताच पथकाने टाकळखोपा- इंचा ते शिरपूर या पाणंद रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो (क्र. २१ बी. एच. २२६२) अडविण्याचा प्रयत्न केला. टेम्पो चालकाने टेम्पो थेट पथकाच्या वाहनासमोर नेऊन अचानक कट मारून पळ काढला. अचानक टेम्पो अंगावर आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला. पथकाने वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत टेम्पो चालक वाहनासह फरार झाला होता. या प्रकरणी कोतलवा बाळासाहेब विठ्ठलराव भुतेकर यांनी पोलीस चौकीत तक्रार दिली.टाकळखोपा येथून दिवसरात्र अवैध वाळू चोरी सुरु होती. महसूलच्या पथकाने वारंवार सूचना दिल्यानंतर अवैध वाळू चोरी बंद होत नव्हती. त्यामुळे कारवाईसाठी पथक दाखल झाले होते. मात्र, वाळू माफियांनी चक्क महसूल पथकाच्या वाहनावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.