आॅटोमोबाईल मंदीचे जालन्यातही पडसाद...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:01 AM2019-11-27T01:01:18+5:302019-11-27T01:02:12+5:30
देशातील आॅटोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका वाहनांचा प्राण असलेल्या बेअरिंग्ज उत्पादन कंपनीला बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : देशातील आॅटोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका वाहनांचा प्राण असलेल्या बेअरिंग्ज उत्पादन कंपनीला बसला आहे. १९८२ पासून जालन्यात अविरत सुरू असलेली सर्वात मोठी कंपनी म्हणून एनआरबीची ओळख आहे. २००८ नंतर प्रथमच कंपनीने उत्पादन कपातीचा निर्णय घेतला आहे. महिन्यातील एक रविवार कंपनी बंद ठेवून कामगारांना वेतनासह सुटी देण्यात येणार आहे. सोमवारी कंपनीची साप्ताहिक सुटी असल्याने दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार असल्याचे कामगार सूत्रांनी सांगितले.
जालन्यातील या कंपनीत जवळपास एक हजारपेक्षा कायम कामगार तर जवळपास ३०० पेक्षा अधिक तात्पुरते कामगार अर्थात कॅज्युअल वर्कर यापूर्वीच कंपनीने कमी केल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. एनआरबी कंपनीत छोट्यात - छोट्या गाडीसह चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या बेअरिंग्जचे उत्पादन केले जाते. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आॅटोमोबाईल इंडस्ट्री अडचणीत होती.
अनेक बड्या कार उत्पादक कंपन्यांनी उत्पादन घटविल्याने एनआरबीच्या बेअरिंग्जच्या मागणीत घट झाली. त्याचा परिणाम जालन्यातील या सर्वात मोठ्या कंपनीला मंदीची झळ पोहोचली.
ही झळ लवकर भरून निघेल, अशी आशा व्यवस्थापनाला होती, परंतु मंदीचे वारे कमी होण्याची चिन्ह नसल्याने व्यवस्थापन आणि कामगारांनी एकत्रित बैठक घेऊन महिन्यात एका आणि वेळ पडल्यास दोन रविवार कंपनी पूर्णपणे बंदी ठेवून उत्पादन कमी करण्यात येणार आहे.
साधारपणे २५ टक्के उत्पादन घटणार असल्याने याचा मोठा फटका उद्योगाला बसला आहे.
विशेष म्हणजे रविवारी कंपनी बंद ठेवल्याने कंपनीचे वीजबिलासह अन्य नित्याच्या लागणाºया बाबी तसेच अन्य खर्चावर यामुळे नियंत्रण आणणे शक्य असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
आज जरी रविवारी कंपनी बंद ठेवण्यात येणार असली तरी भविष्यात ज्यावेळी मंदीचे मळभ दूर झाल्यावर रविवार हा सुटीचा दिवस नंतर अतिरिक्त काम करून ही तूट भरून काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
एलजीबीतील संप : उद्योगविश्व चिंतेत
जालन्यातील आॅटोमाबाईल क्षेत्राशी संबंधित एलजीबी ही उत्पादन वाहनांसाठीच्या चेनचे उत्पादन करते. गेल्या आठ दिवसांपासून या कंपनीत कामगार आणि व्यवस्थापनात झालेल्या किरकोळ वादातून संप सुरू आहे. या संपामुळे उद्योग विश्वासह कामगार विश्वात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यात व्यवस्थापन तसेच कामगारांनी देखील एक पाऊल मागे घेऊन संप मागे घ्यावा, यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु हा संप म्हणजे जालन्यातील उद्योगविश्वात चिंता निर्माण करणारा असल्याचा सूर ऐकण्यास मिळत आहे.