लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी अस्पृश्य आणि उपेक्षित समाजासाठी अपार कष्ट घेतले. घर परिवाराकडे दुर्लक्ष करुन हा महामानव एकाएकी झुंज देत असतानाही कधीही डगमगला नाही. ताठर आणि स्पष्ट वक्ते असलेले बाबासाहेब समाजाच्या कल्याणासाठी घेता येईल तेवढी लवचिकतेची भूमिका घेत होते. उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी बाबासाहेबांनी कशाचीही पर्वा केली नाही, म्हणूनच आज तुम्ही- आम्ही ताठ मानेने जगत आहोत, असे प्रतिपादन रमेश शिंदे यांनी येथे बोलताना केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना शिंदे बोलत होते. यावेळी भीमराव डोंगरे, शेख महेमूद, विजयकुमार पंडित, व्याख्यानमालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती.रमेश शिंदे हे केवळ डॉ. बाबासाहेबांचे अनुयायीच नव्हते तर त्यांनी काही काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर व्यतीत केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा लावणे, स्वत: स्टेजची मांडणी करण्यापासून बाबासाहेब सांगतील तो आदेश मानून शिंदे यांनी ते कार्य केलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभलेल्या रमेश शिंदे यांचे व्याख्यान मुद्दामहून आयोजित केल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. आंबेडकरकालीन चळवळ आणि आजच्या चळवळीतील वास्तव या विषयावर मार्गदर्शन करतांना शिंदे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांकडे प्रचंड गुणसंपदा होती. परंतु घरी अठराविश्वे दारिद्र्य असतानाही त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. बाबासाहेब जस- जसे मोठे होऊ लागले तस- तसे त्यांना या समाजाची उपेक्षा कळू लागली. शिक्षण चालू असतानाच अस्पृश्य समाजाला या जोखडातून बाहेर काढण्याची मनोमन इच्छा बाबासाहेबांची होती. अनंत अडचणींवर मात करुन बाबासाहेबांनी वेळप्रसंगी नोकरी केली. परंतु शिक्षण अर्ध्यावर सोडले नाही. खरे तर बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांचे बाबासाहेबांवर खूप मोठे उपकार होते. कारण बाबासाहेबांना जेव्हा केव्हा शिक्षणासाठी पैशाची गरज भासत होती. त्या-त्या वेळी सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना मदत केली. बाबासाहेब आंबेडकरांनी पी.एचडी केल्यानंतर ते डॉक्टर झाले. परंतु ते एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढील शिक्षणासाठी त्यांना पुन्हा लंडनला जाण्याची वेळ आली. तेव्हा देखील पैशाचाच प्रश्न उभा राहिला. शेवटी बाबासाहेब सयाजीरावांकडे गेले. त्यांना हकीगत कथन केली. परंतु सयाजीरावांनी पैसे देण्याचे कबूल करुन एक अट घातली. पैसे हवे असतील तर नोकरी करावी लागेल. मग कसे करणार, असे जेव्हा सयाजीराव म्हणाले तेव्हा बाबासाहेबांनीही अत्यंत मार्मिक असे उत्तर दिले. ते म्हणाले, मी नोकरीही करीन आणि शिक्षण देखील ! अनंत अडचणींवर मात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विना तिकीट लंडनमध्ये पोहोचले. पदवीही मिळवली परंतु तेथील शिक्षणसम्राटांनी बाबासाहेबांशी वाद घातला आणि कणखर, ताठर असलेल्या बाबासाहेबांनी शिक्षण तर पूर्ण केले मग डिग्रीचे काय करायचे, असे म्हणून ते तेथून परत आले. बाबासाहेब स्वार्थासाठी कधीही लढले नाहीत. परंतु समाजासाठी सर्वस्व दिले.
उपेक्षितांसाठी बाबासाहेबांनी कशाचीही पर्वा केली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:31 AM