वडीगोद्री (जि. जालना) : मी मॅनेज झालो असतो तर मागच्या दाराने घरी गेलो असतो. अजय बारसकर यांनी बुधवारी रात्री केलेल्या आरोपावर गुरुवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. बारसकर यांना एका मंत्र्याने बोलायला लावले असून, ४० लाख रुपये घेऊन बारसकर ही बडबड करत असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.
बारसकर याने देवस्थानच्या नावावर ३०० कोटी घेतले आहेत. भिशीचे पैसे घेऊन हा पळून गेला होता. बारसकरविरोधात चेन्नईच्या एका महिलेची तक्रार आहे. लवकरच ती तक्रार घेऊन समोर येणार असल्याचे जरांगे-पाटील म्हणाले.
मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव
अहमदनगर : मराठा समाजात फूट पाडण्यासाठी सरकारने अजय उर्फ खंड्या बारसकर यांच्या माध्यमातून मोठा डाव रचला आहे. मराठे तो कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत, असा गंभीर आरोप अहमदनगर सकल मराठा समाजाने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
बारसकर हे सरकारला विकलेले आहेत. त्यांनी मराठा आंदोलनात फूट पाडण्याची सरकारकडून सुपारी घेतली आहे, अशीही शंका ॲड. गजेंद्र दांगट यांनी व्यक्त केली आहे.