अर्धवट कामांमुळे इमारती अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:12 AM2019-02-25T00:12:27+5:302019-02-25T00:13:28+5:30
येथील शासकीय रुग्णालय परिसरात बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय व जीएनएम डिप्लोमाच्या इमारतीचे बांधकाम होऊन तीन वर्षे झाले आहे; परंतु अद्यापही इमारतीचे अर्धवट काम राहिले आहेत.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील शासकीय रुग्णालय परिसरात बी.एस्सी. नर्सिंग
महाविद्यालय व जीएनएम डिप्लोमाच्या इमारतीचे बांधकाम होऊन तीन वर्षे झाले आहे; परंतु अद्यापही इमारतीचे अर्धवट काम राहिले आहेत. दरम्यान, या नव्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडून चोरटे इमारतीमधील साहित्य लंपास करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.
मराठवाड्यात बी.एस्सी नर्सिंग महाविद्यालय सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्याचबरोबर जालना येथील जीएनएम डिप्लोमाला नवीन इमारत निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली होती. २००८ व २००९ साली तत्कालनी शिक्षणमंत्र्यांनी या दोन्ही मागण्यांची दखल घेत याला मजूंरी दिली.
त्यानंतर २०१५ साली जालना शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या दोन्ही इमारतीचे काम करण्यात आले. बी.एस्सी नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीसाठी शासनाने ५१० कोटी रुपये खर्च केले तर जीएनएमच्या इमारतीसाठी ७ कोटी ८६ लाख रुपये खर्च करुन सुज्ज अशा या इमारती तयार करुन शहराच्या वैभवात भर घातली. परंतु, मागील तीन ते चार वर्षांपासून या इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिले आहे.
इमारतीमधील हॉलचे काम अपुर्णच आहे. तसेच ड्रेनेजची कामे यासह आदी कामे अर्धवट सोडली आहे. सध्या इमारतीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, खिडक्यांची काचे फोडून चोरटे इमारती मधील साहित्य चोरुन नेत आहे.
या दोन्ही इमारतीच्या जवळपास सर्वच खिडक्यांची काचे फोडण्यात आली असून, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून, सरकारच्या कोट्यांवधी रुपयांचा चुरडा होत आहे.
मोडकळीस आलेल्या
इमारतीत बसतात विद्यार्थी
जीएनएमचे विद्यार्थी जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीत शिक्षण घेतात. तसेच येथे मुलींचे वृस्तीगृह ही आहे.
या सर्व विद्यार्थ्यांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याकडे जिल्हा रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.
भाड्याचा विनाकारण खर्च : बी.एस्सी.साठी मोजावे लागतात लाखो रुपये
बी.एस्सी.चे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना खाजगी महाविद्यालयात लाखो रुपये खर्च येतो. त्यामुळे राज्य सरकारतर्फे राज्यात मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर या ठिकाणी शासकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. जालना जिल्हा व परिसरातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात बी.एस्सी. करता यावे, यासाठी जालना येथे हे महाविद्यालय स्थापन करण्यात आले; परंतु इमारतीच्या अर्धवट कामाअभावी महाविद्यालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
तळीरामाचे अड्डे
या दोन्ही इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. खिडक्यांच्या काचा फोडून दारुडे आता प्रवेश करून साहित्याची तोडफोड करतात. इमारतीत असलेली लाईट व वायरिंग यासह इतर साहित्य लंपास केल्याचे दिसून आले.