चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांना आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:49 AM2019-08-01T00:49:44+5:302019-08-01T00:50:07+5:30
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरासह जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरासह जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. मंगळवारी जालना शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता. तर पीरपिंपळगाव येथे एकाच रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडण्याचा प्रयत्न केला.
मागील काही दिवसांपासून शहरात एटीएम फोडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांना सुरक्षेबाबत सूचना दिल्या होत्या. परंतु, बँकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.
मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी एटीएम व बँकांना आपले लक्ष्य केले आहे. याच महिन्यात चोरट्यांनी एसबीआय बँक फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी बॅँकांच्या अधिकाºयांची बैठक घेऊन रात्रींच्यावेळी एटीएमवर सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही बसव्यात अशा सूचना दिल्या होत्या.
परंतु, बँकांनी पोलीस अधीक्षकांच्या या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. मंगळवारी मध्यरात्री शहरातील जुना मोेंढा परिसरातील आयडीबीआय बँकेच्या एटीएमवर सुरक्षारक्षक नसल्याने चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, एटीएम न उघडल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोनि. संजय देशमुख यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, चोरट्यांनी एटीएम फोडीचा प्रयत्न हा समोरील सीसीटीव्ही फोडल्यामुळे तो चित्रित होऊ शकला नाही. असे निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली. याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक अमोल मोहन हळदीवर यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या चोरीच्या प्रयत्नाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळताच त्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. लवकरच चोरट्यांचा शोध लावू असे ते म्हणाले.
एटीएममध्ये होते ३० लाख रुपये
शहरातील जुना मोंढा परिसरातील आयडीबीआय या बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता. या एटीएममध्ये मंगळवारी सायंकाळी ३० लाख रुपये टाकण्यात आले होते. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोनि. यशवंत जाधव यांनी भेट दिली.
पीरपिंपळगावात एकाच रात्री तीन घरे फोडली
मानदेऊळगाव : जालना तालुक्यातील पीरपिंपळगावात मंगळवारी रात्री अंधार आणि रिमझिम पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करुन सोने, चांदीचे दागिने, मोबाईल असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.गावातील विष्णू रघुनाथ शेळके हे घराला कुलूप लावून कुटुंबासह देवमूर्ती येथे गेले होते. याच संधी फायदा घेऊन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख ७० हजार रुपये, दोन तोळ्याचा सोन्याचे नेकलेस, सोन्याची अंगठी, चांदीचे कडे असा दीड लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला.
तर गावातीलच कपिल त्र्यंबक खिल्लारे आणि तान्हाजी काळूबा मगरे हे घरासमोर असलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये झोपले होते. खिल्लारे यांच्या पॅन्टमधील २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, दीड हजार रुपये रोख, आणि इतर साहित्य चोरुन नेले, तर तान्हाजी मगरे यांच्या घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे तीन तोळ्याचे दोन सोन्याचे हार चोरुन नेले. बुधवारी सकाळी विष्णू शेळके यांचे बंधू भगवान शेळके यांना आपल्या भावाच्या घराचे कुलूप तुटल्याचे दिसले.
घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आल्याने त्यांनी तातडीने चंदनझिरा पोलिसांना माहिती दिली. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोडले, रावसाहेब सिरसाठ, बीट अंमलदार मतकर यांनी श्वानपथकासह गावात येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी विष्णू रघुनाथ शेळके यांच्या फिर्यादीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.