तीर्थपुरीत बस जाळली, अंबड तालुक्यात संचारबंदी लागू; जरांगेंच्या एका सहकाऱ्यासह ५ ताब्यात
By विजय मुंडे | Published: February 26, 2024 08:18 AM2024-02-26T08:18:57+5:302024-02-26T08:21:34+5:30
अंतरवाली सराटीतून भांबेरी पर्यंत गेले असून रविवारी रात्री समाज बांधवांच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत.
विजय मुंडे जालना: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबदी लागू करण्यात आली आहे. त्याच बरोबर मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह ५ जणांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथे एक बस (क्रमांक एम एच १४- बी टी १८२२) जाळण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली आहे. ते अंतरवाली सराटीतून भांबेरी पर्यंत गेले असून रविवारी रात्री समाज बांधवांच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत. तेथून ते सोमवारी दुपारी पैठण, बिडकीन, गंगापूर, येवला, नाशिक, ठाणे आणि मुंबई येथील सागर बंगल्यावर जरांगे पाटील जाणार आहेत. याचं दरम्यान रविवारी मध्यरात्री अंबड तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संचारबदी लागू करण्यात आली आहे. त्याच बरोबर मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह ५ जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांचा मोठा फौज फाटा भांबेरी गावात तैनात करण्यात आला असून, भांबेरी गावात येणाऱ्या ११ ठिकाणी पोलिसांनी बॅरीकेट लावण्यात आले आहेत.
संचारबंदी आदेश दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत.
आदेशामधून यांना सुट राहील
१. शासकीय/निमशासकीय कार्यालये.
२. शाळा/महाविद्यालये
३. राष्ट्रीय महामार्ग व इतर मार्गावरील वाहतूक.
४. दूध वितरण.
५. पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना.