गावरान पानाच्या विड्याला 'कलकत्ता'चा ब्रेक ! पानमळे आली निम्म्यावर
By विजय मुंडे | Published: August 22, 2023 07:08 PM2023-08-22T19:08:35+5:302023-08-22T19:09:38+5:30
कामासाठी मजूर मिळेनात, उन्हाळ्यात पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांनी गावरान पानमळे जगवणे अवघड झाले आहे
जालना : घरगुती कार्यक्रम कोणताही असो त्यात पानाचा विडा नाही असे होत नाही! धार्मिक कार्यक्रमांमध्येही गावरान पानांचे महत्त्व अधिक आहे. परंतु, बदलत्या काळानुरूप युवा वर्गाचा कलकत्ता, बनारसी पानाकडे वाढला आहे. यामुळे दहा वर्षांतच गावरान पानांची असलेली मागणी निम्म्यावर आली असून, याचा परिणाम पानमळे मोडीत निघण्यावर झाला आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद तालुक्यांतील भारज, वालसावंगी, वालसा या गावांसह इतर ठिकाणी आठ-दहा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पानमळे होते. धार्मिक कार्यक्रमात पूजेसाठी गावरान पानाचे महत्त्व आहे. त्यात घरगुती किंवा इतर कार्यक्रम असाेत जेवणानंतर पानाचा विडा आवर्जून एकमेकांना दिला जात होता. शिवाय पान खाण्याने शरीराला लाभ होत असल्याचे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात. परंतु, बदलत्या काळानुरूप कलकत्ता भागातून आलेले कलकत्ता पान आणि बनारस भागातून येणारे बनारस पान यामुळे युवा पिढीचा ओढा या पानांकडे वाढला आहे. गावरान पानांना बाजारात असणारी मागणी घटली आहे. दुसरीकडे पानमळ्यांसाठी मुबलक पाण्याची उपलब्धताही होत नाही. याचा परिणामही पानमळ्यांवर झाला आहे. पानमळ्यातील वेली लावण्याचे आणि पाने तोडण्याचे कामही जिकिरीचे आहे. हे काम करण्यासाठी मजुरांची उपलब्धता ग्रामीण भागात होत नाही. या सर्व बाबींचा परिणाम गावरान पानमळे कमी होण्यावर झाला आहे.
अनेकांनी पानमळे मोडले
आमच्याकडे गत १५ वर्षांपासून पानमळा आहे. एकेकाळी पानांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. चिखली, खामगाव, संभाजीनगर, श्रीरामपूर आदी ठिकाणी २५०० पानांचा पिटारा पाठविला जात होता. परंतु, गावरान पानांची मागणी घटली आहे. त्यात पाणी आणि मजुरांची टंचाईही आहे. यामुळे अनेकांनी पानमळे मोडीत काढले आहेत.
- वसंतराव बोडखे, शेतकरी, भारज (बु.)
५०० पनांची मागणी शंभरावर
आमच्या चार पिढ्यांपासून पान तयार करण्याचा व्यवसाय केला जातो. दहा वर्षांपूर्वी आम्हाला दैनंदिन ५०० गावरान पान लागत होते. परंतु, आता कलकत्ता, बनारस पानांना ग्राहकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे दिवसाला केवळ १०० गावरान पाने लागतात.
- राजेश कोंड्याल, व्यापारी, जालना