लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधी पावसाच्या प्रतीक्षेने आणि नंतर पावसाच्या कहरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाचे उत्पन्न घटले असून, दर्जा घसरल्याने सोयाबीन आणि मका कवडीमोल भावाने विक्री करावी लागली. आता कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यात सहा गावांना भेटी देऊन पिकांची स्थिती जाणून घेणार आहेत. यापूर्वीही असे पथक आले होते, त्याचा कुठलाच लाभ झाला नाही, त्यामुळे हे पथक येऊन आमच्या पदरात काय पडणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.जालना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे शेतकरी संकटातच आहे. मध्यंतरी राज्य सरकारने जी दीड लाख रूपयांची कर्जमाफी जाहीर केली होती, त्यातील अनेक शेतकरी अद्याही या योजनेपासून वंचित असल्याचे वास्तव आहे. त्यातच पीकविमा कंपन्यांनी विमाहप्ता भरतांना जी रक्कम वसूल केली, त्या तुलनेत नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये केंद्राचे पथक पाहणी दौ-यावर आले होते. त्यावेळी कोरडा दुष्काळ होता आणि आता परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी रविवारी जालना जिल्ह्यातील केळीगव्हाण, दरेगाव, पिंपळगाव थोटे, चांदई एक्को, गवळी पोखरी आणि अकोला देव या गावांना भेटी देणार आहे.या भेटी दरम्यान ते प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी त्या-त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना सतर्क राहण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.फळबागांनाही भेटी द्याव्यातरविवारी केंद्रीय पथकाचे अधिकारी दौ-यावर येत आहेत. या अधिका-यांनी फळबागांना भेटी द्याव्यात, अशी मागणी कडवंची येथील सरपंच चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर या अवकाळी पावसामुळे डाळिंब तसेच मोसंबी बागांचेही मोठे नुकसान झाले असून, त्या-त्या भागातील फळबागांनाही पथकातील अधिका-यांनी भेटी द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
केंद्रीय पथकाचा दौरा सोपस्कार ठरू नये...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:37 AM