केंद्रीय पथकाकडून केवळ दीड तासात दोन गावांच्या नुकसानीची पाहणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:29 AM2019-11-25T00:29:02+5:302019-11-25T00:29:39+5:30
केंद्रीय पथकाने रविवारी तालुक्यातील पळसखेडा ठोंबरी, चांदई एक्को भागातील नुकसानीची दीड तासात पाहणी करून जाफराबाद तालुक्याचा मार्ग धरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन / राजूर : परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि कुटुंबावर कोसळलेल्या व्यथा केंद्रीय पथकासमोर मांडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. केंद्रीय पथकाने रविवारी तालुक्यातील पळसखेडा ठोंबरी, चांदई एक्को भागातील नुकसानीची दीड तासात पाहणी करून जाफराबाद तालुक्याचा मार्ग धरला.
पथक प्रमुख तथा अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरूपगल, डॉ. के. मनोहरण, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे व इतर अधिकाऱ्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. चांदई एक्को येथील श्रीराम ढाकणे या ८८ वर्षाच्या शेतक-याच्या शेतातील मका व सोयाबीन या पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. आपल्या आयुष्यात अशी नैसर्गिक आपत्ती आली नव्हती. इतके नुकसान झाले नव्हते हे सांगताना ढाकणे यांचे डोळे पाणावले होते. ग्रामसेवक, कृषी विभागाच्या पथकाने पाहणी केली. मात्र, मदत मिळाली नाही. तुम्ही आले आणि चालले मदत केव्हा मिळणार? अशी विचारणा ढाकणे यांनी केली. मात्र, त्यांचे म्हणणे लिहून घेत अधिकारी पुढच्या दौ-याकडे गेले.
पळसखेडा ठोंबरी येथील शिवाजी गायकवाड यांच्या शेतातील मकाच्या नुकसानीची पथकाने पाहणी केली. त्यानंतर राजूर येथे अनिल भालेराव यांच्या मका खरेदी केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. आणि त्यानंतर हे पथक जाफराबादकडे रवाना झाले.
तालुक्यातील भोकरदन, वाकडी, आन्वा, जळगाव सपकाळ, पाारध, वालसावंगी, धावडा, पिंपळगाव रेणुकाई या भागात प्रारंभीपासूनच अतिवृष्टी झाली होती. परतीच्या पावसानेसुध्दा या भागातील पिकाचे मोठे नुकसान झाले. मात्र, केंद्रीय पथकाने या भागाची पाहणी केली नाही.
किती वेळा पाहणी करणार
नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतक-यांनी आता किती वेळा पाहणी व पंचनामे करता आम्हाला रबीच्या हंगामासाठी मदत मिळेल एवढेच काम लवकर करा, असे सांगितले. मात्र शेतक-यांची भाषा या पथकातील अधिका-यांना समजत नव्हती, एवढे मात्र खरे!