जालना : शहरासह परिसरातील चैन स्नॅचिंग, घरफोड्या, जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. अटकेतील तिघांकडून १४० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ५ लाख ९३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ११ सप्टेंबर रोजी जालना शहरातील कैकाडी मोहल्ला भागात करण्यात आली. कारवाईनंतर रविवारपर्यंत चौकशी करून वरील जप्त करण्यात आला.
जालना शहर व परिसरात झालेल्या जबरी चोऱ्या, चैन स्नॅचिंगसह इतर चोऱ्यांमधील तीन आरोपी कैकाडी मोहल्ला भागात असल्याची माहिती ११ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ११ सप्टेंबर रोजी जालना शहरातील कैकाडी मोहल्ला भागात कारवाई करून आकाश उर्फ चोख्या राजू शिंदे (रा. नूतन वसाहत, जालना), सचिन बाबू गायकवाड (रा. कैकाडी मोहल्ला जालना), राम सखाराम निकाळजे (रा. चिलमखा देऊळगाव राजा) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी विविध गुन्ह्यांची कबुली दिली. कदीम पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.
चौकशीमध्ये संबंधितांकडून ३० ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर चैन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोड्यातील ११० ग्रॅम सोन्याचे दागिने असे एकूण १४० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख २५ हजार व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ५ लाख ९३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून इतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अधिक तपास पोउपनि दुर्गेश राजपूत हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, पोउपनि दुर्गेश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, पोना गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, पोकॉ सचिन चौधरी, विलास चेके, रवी जाधव आदींच्या पथकाने केली.
८ ठिकाणी केल्या चोऱ्याअटकेतील आरोपींनी जालना शहरातील बजरंग दालमील परिसर, ब्रम्हणगल्ली, पिवळा बंगला परिसर, जालना-अंबड रोड, भाग्यनगर, समर्थ नगर, कांचन नगर, प्रकाश ट्रान्स्पोर्ट, नवीन मोंढा आदी भागात चैन स्नॅचिंग, जबरीचोरी, घरफोडी केल्याची कबुली पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.