लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतीशी निगडीत असलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकसंवाद कार्यक्रमातून संवाद साधून शासनाकडून मिळालेल्या लाभाबाबत विचारपूस केली. यावेळी उपस्थित शेतकºयांनी शासनाच्या योजनांमुळे शेतीमध्ये समृद्धता आल्याची भावना व्यक्त केली.याप्रसंगी वैजिनाथ साहेबराव फुके, (उमरखेडा ता. भोकरदन), आसाराम रामकृष्ण बोराडे (पाटोदा, ता. मंठा), सुरेश पंडित काळे (वडीगोद्री ता. अंबड), दीपक रंगनाथ म्हस्के (वरुड ता. जालना), कृष्णा विठ्ठल उबाळे ( पळसखेडा मुर्तड ता. भोकरदन), उमेश अंकुशराव फुके (उमरखेड ता. भोकरदन) या शेतकºयांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनामार्फत ट्रॅक्टर खरेदीसाठी देण्यात आलेले अनुदान आॅनलाईन थेट खात्यात मिळाले काय ? अनुदान मिळवण्यासाठी काही अडचणी आल्या का? असे प्रश्न विचारताच आसाराम बोराडे म्हणाले की, मी माळकरी माणूस आहे, खोटे बोलणार नाही. अनुदान थेट माझ्या खात्यात जमा झाले. यासाठी मला कुठलाही त्रास सहन करावा लागला नाही. केवळ १५ दिवसांत ट्रॅक्टर खरेदीसाठी एक लाख पंचवीस हजार रुपये मिळाले.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसंवाद कार्यक्रमाचे समन्वयक राजीव नंदकर, कृषि अधिकारी विजय माईनकर, अमोल महाजन व लाभार्थी उपस्थित होते.भोकरदन तालुक्यातील उमरखेडा या गावातील शेतकरी वैजिनाथ फुके मुख्यमंत्र्यांशी बोलताना म्हणाले की, मी गरीब कुटुंबातील असून एकट्याने शेती करणे परवडत नसल्याने गटशेती करतो. बीजोत्पादनासाठी १० गुंठ्यामध्ये शेडनेटचा लाभ मिळाला. शेडनेटच्या माध्यमातून मिर्ची पीक घेतले व यातून तीन लक्ष रुपयांचा लाभ मला मिळाला. मागेल त्याला शेततळे योजनेमधुन ५० हजार रुपये अस्तरीकरणासाठी ७५ हजार रुपयेही मला मिळाले असून शासनाच्या या योजनांमुळे माझ्या आर्थिक उत्पन्नात भर पडत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. माझी २५ एकर शेती असून पाच एकरवर द्राक्ष पिकाची लागवड केली आहे. या पिकासाठी आधुनिक औजारांची आवश्यकता होती. शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून लाभ मिळाल्याने मोठा लाभ झाल्याची भावना शेतकरी दीपक रंगनाथ म्हस्के यांनी व्यक्त केली. आमचे म्हणणे थेट मुख्यमंत्री महोदयपर्यंत पोहोचविण्याची संधी लोकसंवाद कार्यक्रमातून मिळाल्याचा आनंद शेतकºयांनी व्यक्त केला. भोकरदन तालुक्यातील मुर्तड येथील शेतकरी कृष्णा विठ्ठल उबाळे यांना मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ मिळाल्याने ५० हजारांवरील उत्पन्न ३ लाखांपर्यंत गेल्याने शासनाचे आभार व्यक्त केले तर भोकरदन तालुक्यातील उमरखेडा या गावातील शेतकरी उमेश अंकुश फुके यांनी एचडीएफसी बँकेकडून चार लक्ष रुपयांचे कर्ज घेतले होते. परिस्थिती जेमतेम असल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य नव्हते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयांचे कर्ज माफ झाल्याने मोठा आधार मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे लोकसंवाद कार्यक्रमात व्यक्त केली.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 1:04 AM