लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्यात नाताळ सण मंगळवारी परंपरागत उत्साहात साजरा करण्यात आला. जालन्यातील विविध चर्चमध्ये सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅथेड्रेल चर्चमध्ये रेव्हरंट पी.के.अल्हाळ आणि रेव्हरंड एम.बी. जाधव यांनी प्रभू येशूच्या जन्माचा आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाची आजही जगाला तेवढीच गरज असल्याचे सांगून, जगात शांतता नांदावी म्हणून सर्वानी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.मंगळवारी येथील मिशन हॉस्पिटल जवळील चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवाची सकाळपासूनच गर्दी दिसून आली. सकाळी ११ वाजता प्रार्थनेला प्रारंभ होऊन दुपारी दोन वाजेपर्यंत ही प्रार्थना चालली. यावेळी सर्वधर्म समभाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चमध्ये येऊन धर्मगुरूंचा सत्कार केला तर चर्चच्यावतीनेही सर्वधर्म समभावच्या पदाधिका-यांचा सत्कार केला. यावेळी प्रभू येशू आणि त्यांच्या एकूणच जीवनातील अनेक भावपूर्ण प्रसंग धर्मगुरूंनी सागितले. यावेळी जगात शांतता आणि सुख समृध्दी राहावे म्हणून सामूहिक प्रार्थना करण्यात आली.नाताळ निमित्त शहरातील सर्वच चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अंबड, बदनापूर तसेच जालना तालुक्यातील बेथलम येथेही नाताळ सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. जालन्यातील प्रार्थनेच्या वेळी शहरातील आर.एन.म्हस्के, उलम गायकवाड, सुरेंद्र पाटोळे, नोवेल पाखरे, ईश्वर भालेराव, प्रतीक गायकवाड, वीरेंद्र गायकवाड, डॉ.सीमा निकाळजे, प्रतिमा निकाळजे, मार्गारेट आल्हाद, श्रुती नेटके, सुमन गायकवाड, ए.जी. निकाळजे, राहुल शिंदे आदींसह अन्य समाज बांधवांची उपस्थिती होती.बदनापूर येथील संत थॉमस चर्चला शंभरपेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बांधवांची संख्या आहे. नाताळ निमित्त या चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या निमित्त जालन्यासह अन्य चर्चमध्ये रात्री प्रभू येशूची भजन संध्याही साजरी करण्यात आली. अंबडसह भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, मंठा या तालुक्यांतही नाताळ सण साजरा करण्यात आला. नाताळ निमित्त ख्रिस्ती बांधवांना त्यांच्या मित्र परिवाराकडूनही शुभेच्छा देण्यात आल्याचे सांगण्यात आले.विविध ठिकाणी सांताक्लॉजनाताळ सणानिमित्त बाजारपेठही सजली होती. अनेक दुकानांबाहेर स्वागतासाठी सांताक्लॉजची प्रतिकृती उभी करण्यात आली होती. गेल्या आठवडाभरापासूनच बाजारावर नाताळचा प्रभाव दिसून आला. नवीन तयार कपडे खरेदीवर भर देण्यात आल्याचे सांगून नाताळमुळे बाजारावर आलेली मरगळ काही प्रमाणात दूर झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यात नाताळ सणाचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:23 AM