लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या जेईएस महाविद्यालय हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमित्त गेल्या ६० वर्षात या महाविद्यालयाने दिलेल्या योगदानाबद्दल एका हीरक महोत्सवी विशेषकांचे प्रकाशन करणार आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू येवले यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. हा समारंभ मंगळवारी सायंकाळी होणार आहे.जेईएस महाविद्यालयाची मुहूर्तमेढ ही देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रेरणेतून रोवली गेली. यासाठी स्वत: पंडित नेहरू जालन्यात आले होते. त्यावेळी त्यांचा सत्कार करताना त्यावेळच्या व्यापाऱ्यांनी २५ हजार रूपयांची थैली त्यांना भेट दिली. ते पैसे लगेचच त्यांनी व्यापाऱ्यांना परत करून यातून जालन्यात महाविद्यालय उभारण्याची विनंती केली आणि हे महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयाचे संस्थापक म्हणून आर.जी. बगडिया, एस.बी. लखोटिया आणि आर. बेझंजी हे होते. त्यांनी रोवलेल्या शैक्षणिक रोपट्याचे आज ६० वर्षात एक वटवृक्ष झाला आहे. प्रारंभी कला आणि वाणिज्य शाखा असलेल्या महाविद्यालयात नंतर विज्ञान शाखाही सुरू करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक लॅब असलेले त्या काळातील हे एकमेव महाविद्यालय होते. मराठवाड्यातील हे पाचव्या क्रमांकाचे महाविद्यालय असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांनी दिली.काळानुरूप बदल करून या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने आपले महत्त्व आणि गुणवत्ता कायम राखली आहे.गेल्या साठ वर्षाचा विचार करता या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने दाखविलेले पुरोगामी आणि लोकशाहीला धरून ठेवणारे निर्णय घेऊन तज्ज्ञ प्राचार्य तसेच प्राध्यापकांची फौजच या महाविद्यालयास लाभली आहे. त्यांच्या या विद्यादानातून या महाविद्यालयाने आज केवळ राज्यालाच नव्हे तर देशालाही अनेक दिग्गज आणि हुशार विद्यार्थी दिले आहेत. त्यांच्यामुळे जालन्याच्या या महाविद्यालयाची ख्याती ही देशभर पसरलेली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या महाविद्यालयास लाभलेले पाहिले प्राचार्य पी.एम. सप्रे, के.डी. गादिया, सी.के. लखोटिया, गो.रा. सिकची, डॉ. आर.जी. अग्रवाल, डॉ. आर.एस.अग्रवाल यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध स्तुत्य उपक्रम राबवून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. एकूणच या महाविद्यालयातून शिक्षण घेलेले विद्यार्थी हे केवळ नोकरीतच नाहीत, तर मोठे उद्योजक झाले असून, अनेकजण राजकारणातही सक्रिय आहे. त्यातील प्रमुख नावे म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. अरविंद चव्हाण, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांच्यासह अनेकांची नावे घेतली तर ती यादी खूप मोठी होईल.
उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे महाविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:51 AM