वाळू तस्करांना मदत करणाऱ्या सव्वाशे जणांविरुध्द महसूलची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:53 AM2019-11-26T00:53:32+5:302019-11-26T00:53:54+5:30
अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणा-या तस्करांना मदत केल्याप्रकरणी सव्वाशे जणांविरूध्द महसूल प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेषत: सातबारा नावे असलेल्या महिलांविरूध्दही तक्रार देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अंबड तालुक्यातील कुरण, पाथरवाला (बु.) येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणा-या तस्करांना मदत केल्याप्रकरणी सव्वाशे जणांविरूध्द महसूल प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेषत: सातबारा नावे असलेल्या महिलांविरूध्दही तक्रार देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कुरण, पाथरवाला (बु.), बाबाची थडी येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधवाळू उत्खनन, वाहतूक थांबता थांबत नाही. तर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या शेतजमीन धारकांनी अवैधवाळू तस्करांकडून चिरीमिरी घेऊन अवैध साठेबाजी करण्यासाठी जागा, अवैधरीत्या वाळू भरून ट्रॅक्टर, हायवांना जाणे-येणे साठी शेतीतून रस्ते करून दिले होते. त्यामुळे महसूल अथवा पोलिसांचे पथक आले तर पथक गोदापात्रात येईपर्यंत तस्कर वाहनांसह पसार होत होते.
विधानसभा निवडणुकीत संपताच उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी वाळू तस्करांविरूध्द कारवाईचा सपाटा लावला आहे. तोच वाळू तस्करांबरोबर त्यांना मदत करणारेही तितकेच गुन्हेगार आहेत, त्यामुळे नैसर्गिक आपत्ती पर्यावरणा'चा -हास होत आहे. या बाबीचा विचार करून उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांकडून गोपनीय माहिती संकलित करण्यात आली. अवैध वाळू साठे, वाहतुकीसाठी शेतजमीन, रस्ते देणा-या शेतजमीन मालका विरूद्ध सातबारा उता-यावर नावे असलेल्या नुसार मंडळाधिकारी श्रीपाद मोताळे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय विश्वनाथ भारती, वामनबुआ विश्वनाथ भारती, भागीरथी विश्वनाथ भारती, राजू फुलारे, संभा मोरे, (सर्व रा.सर्व पाथरवाला बु., ता. अंबड), राजेंद्र बबनराव कुरणकर, आयोध्या बबनराव कुरणकर, कमलबाई बबनराव कुरणकर, भीमराव रामा कांबळे, राक्षे, (रा.सर्व कुरण ता.अंबड) व इतर शंभर अशा सव्वाशे जणांविरुद्ध संगनमत करून अवैधवाळू उत्खनन, साठे, वाहतूक केल्याने पर्यावरणा'चा नैसर्गिक संपत्तीचा रास होऊन नैसर्गिक वातावरण दूषित केल्याप्रकरणी महसूल खात्याने गोंदी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गोपनीय माहितीनुसार तक्रार
अवैधवाळू तस्करांना अवैध वाळू साठे करण्यासाठी, अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी ज्या- ज्या मालकांनी शेतजमीन दिल्या आहेत, अशांची गोपनीय माहिती घेऊनच तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या त्या शेतजमिनीच्या सातबारा उता-यावर नावे असलेल्यांची नावेच तक्रारीत आहेत. - शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी, अंबड