लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासाठी २८ मार्च २०१९ रोजी पासून नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल आहे. राजकीय पक्ष प्रतिनिधींनी निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांच्यासह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीमध्ये भास्कर आंबेकर, राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, तय्यबबापू देशमुख, अनिल मिसाळ, हिवाळे, सूर्यकांत कलशेट्टी, दीपक रणनवरे, सुरेश कदम आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, निवडणुकीदरम्यान आदर्श आचार संहितेचे सर्व पक्षांनी पालन करावे. निवडणुकीमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आयोगाकडून संगणकीय अॅप्लिकेशन उपलब्ध करुन देण्यात येणार असुन, याचा वापर राजकीय पक्षांनी करण्याचे आवाहन करत जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा परवानग्यांसाठी कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे सांगितले. उमेदवारांना ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. यापेक्षा जास्त खर्च होऊन आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही.याबाबत काळजी घेण्यात यावी. आचारसंहिता अंमलबजावणीकरिता राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
प्रशासनास सहकार्य करावे - रवींद्र बिनवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:50 AM