आंब्याच्या विक्रीला कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:28+5:302021-04-23T04:32:28+5:30
जालन्यात कोकणचा राजा दाखल जालना : शहराच्या बाजारपेठेत जिल्ह्यासह परजिल्ह्यांतून आणि परराज्यांतून आंबा दाखल झाला आहे. मात्र, मागील ...
जालन्यात कोकणचा राजा दाखल
जालना : शहराच्या बाजारपेठेत जिल्ह्यासह परजिल्ह्यांतून आणि परराज्यांतून आंबा दाखल झाला आहे. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह राज्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि कोरोनाच्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका आंब्यांच्या विक्रीवर होत आहे. परिणामी, आंब्यांचा गोडवा यंदा काहीसा कमी झाल्याचे दिसून येते.
जालना शहरासह जिल्ह्यात आंध्र प्रदेश, गुजरात, पश्चिम महाराष्ट्र, कोकण येथून आंबा दाखल होतो. दरवर्षी अक्षयतृतीयेपासून आंबा खाण्याचे आणि रसाळीचे महत्त्व आहे. तसा मार्चपासून राज्यातील आंबा येथे दाखल होतो. जालन्यातील बाजारपेठेत बदाम, लालबाग, केशर, दशहेरी, हापूस आणि काहीसा गावरान आंबा विक्रीसाठी येतो. यामध्ये यंदा बदाम आणि लालबागच्या खरेदीला ग्राहकांची पसंती आहे. आधीच व्यापारी लॉकडाऊनने त्रस्त असताना त्यात पावसामुळे विक्रीचे नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पादक व विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.
असे आहेत दर
बदाम ६०
लालबाग ५५
केशर ११५
दशहेरी १०५
जालन्यात कोकणातून येणा-या हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. यात देवगड, रत्नागिरी यासह परिसरातील विविध भागांतून कोकणचा राजा दाखल होतो. त्याची मागणी पाहता यंदा ८ ते ९ रुपयांना रुपयापोटी विकली जात आहे.
मागील वर्षासह याही वर्षी लॉकडाऊनने विक्रीवर परिणाम झाला आहे. पावसाचा फटका बसला तो तर वेगळाच. विक्री होत असली तरी त्याचा फायदा व्यापा-यांना अद्याप झाला नाही.
समीर शेख, आंबाविक्रेते