जालना : जालना जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या ६० वर गेली आहे. जागृती करूनही रस्त्यावर फिरणाºया नागरिकांना चौका-चौकात उभारलेल्या पोलिसांनी गुरुवारी चांगलेच फटके दिले. मास्क न बांधणा-यांना काठ्यांचा प्रसाद देऊन त्यांना रूमाल किंवा मास्क बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनाही बंद आहेत. जालना जिल्ह्यात ६० कोरोना संशयितांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले आहेत. पैकी गुरूवारी सकाळी ५१ जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कोरोनाबाबत प्रशासन जागृती करीत आहे. मात्र, अद्यापही अनेकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. जीवनावश्यक साहित्य खरेदीच्या नावाखाली गुरूवारी सकाळी अनेकजण रस्त्यावर उतरल्याचे चित्र जालना शहरात दिसून आले.
शहरातील बसस्थानकासमोर उभा असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या कर्मचा-यांनी दुचाकीस्वारांची चौकशी करून चांगलेच फटके दिले. शिवाय चारचाकी वाहने, रिक्षा चालकांनाही चोपून काढण्यात आले. विशेषत: आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणारे अनेकजण रस्त्यावर फिरताना मास्क किंवा हातरूमाल तोंडाला न बांधता फिरताना दिसून आले. अशांची फिरकी घेत पोलिसांनी त्यांनाही दक्षतेबाबत सूचना दिल्या. गुरूवारी दुपारपर्यंत तरी जालना शहरातील रस्त्यावरील वर्दळ कायम होती.