डायलर टोनवर कोरोनाची धून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:00 AM2020-03-08T00:00:12+5:302020-03-08T00:00:16+5:30
मोबाईल डायलर टोनवरही कोरोनाबाबत जागृती केली जात आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : चीन पाठोपाठ आता भारत देशातही कोरोना संशयित रूग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात अद्याप या कोरोनाचा एकही संशयित आढळून आलेला नाही. मात्र, दक्षतेचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने जागृती सुरू केली आहे. विशेष म्हणजे अनेकांच्या मोबाईल डायलर टोनवरही कोरोनाबाबत जागृती केली जात आहे. तर दक्षता म्हणून महिला दिनानिमित्त, धुलीवंदनानिमित्त होणारे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रूग्णालयात विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शिवाय जिल्ह्यातील तालुका व ग्रामीणस्तरावरील मोठ्या रूग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विविध माध्यमातून कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेची जागृतीही केली जात आहे. विशेष म्हणजे गत काही दिवसांपासून अनेकांच्या मोबाईलच्या डायलर टोनवरही कोरोनाबाबत जागृतीची धून वाजत आहे. यात कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेची माहिती दिली जात आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मोबाईलवर ही डायलर टोन ऐकू येत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांची जागृती होण्यास मदत होत आहे. नागरिकांची गर्दी होणारे अनेक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. काही शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीही मास्क वापरून दक्षता घेत आहेत.
कृषी मंडळाचा कार्यक्रम रद्द
कोरोना या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. जिलहाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीही खबरदरीचे उपाय म्हणून गर्दीचे कार्यक्रम रद्द केले आहे. या अंतर्गत रविवारी होणारा कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे श्रीकृष्ण सोनुने यांनी सांगितले.
हात जोडूनच स्वागत करावे
कोरोना व्हायरसची लागण टाळण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तीक पातळीवरील स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे. खोकणा-या व शिकंणाºयापासून दूर राहून हात जोडूनच स्वागत करावे.
- राजेश राऊत, उपनगराध्यक्षा, जालना