जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू आहे. मात्र, जीवनावश्यक साहित्य खरेदी करताना नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करीत आहेत. ही बाब पाहता पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत असलेली किराणा दुकाने, मेडिकल, भाजीपाला विक्रेत्यांच्या समोर तीन तीन फुटाचे मार्कींग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी चुन्याद्वारे मार्किंग करून बॉक्स तयार करण्यास सुरूवात केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनही अहोरात्र प्रयत्न करीत आहे. जालना जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत ५२ कोरोना संशयित आढळून आले आहेत. पैकी ४२ जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. संचारबंदी असतानाही नागरिक घराबाहेर पडत असून, रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कायम आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना मास्क बांधण्यासह एकमेकांमध्ये अपेक्षित अंतर सोडण्यात येत नाही. ही गंभीर बाब पाहता पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सर्वच पोलीस ठाण्यातील अधिका-यांना आपापल्या हद्दीतील किराणा दुकान, मेडीकल, औषध विक्रेत्यांसह जीवनावश्यक आस्थापनांच्या समोर किमान तीन तीन फुटांचे मार्किंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि शामसुंदर कौठाळे व त्यांच्या टीमने चंदनझिरा हद्दीतील सहा औषधी दुकाने, १२ किराणा दुकाने, सहा भाजीपाला विक्रेत्यांच्या समोर चुन्याद्वारे तीन- तीन फुटांचे बॉक्स मारले आहेत. एकाच ठिकाणी केवळ तीन ते चार बॉक्स मारले जात आहे. जेणेकरून पाच पेक्षा अधिक नागरिक एका ठिकाणी येणार नाहीत, याची दक्षताही पोलीस अधिकारी, कर्मचारी घेत आहेत.
स्वयंशिस्त गरजेचीचएका ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये आणि त्यांच्यामध्ये तीन फुटांचे अंतर रहावे, यासाठी सर्वच जीवनावश्यक आस्थानांच्या समोर तीन- तीन फुटांचे मार्किंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही नागरिक आजही घराबाहेर पडत आहेत. कोरोना विषाणूचा लढा हा सर्वांनी लढायचा आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने घरात थांबावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये. कोरोनाबाबत जिल्हा प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे.- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना