CoronaVirus : जालना जिल्ह्यातील अठराशे मजूर निजामाबाद जवळ अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 06:36 PM2020-04-01T18:36:57+5:302020-04-01T18:42:08+5:30
जालन्यात परतत असताना रोखले सीमेवर
जालना : शेतीकामासाठी आंध्रप्रदेशमध्ये गेलेल्या जवळपास १ हजार ८०० मजुरांना ते जालना जिल्ह्यातील गावाकडे येत असतांना निजामाबाद सीमेवर त्यांना रोखण्यात आले. त्यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी संपर्क करुन जालन्यात येण्याची विनंती केली. परंतु, ते शक्य नसल्याने आ. गोरंट्याल यांच्या विनंतीनंतर त्यांची जेवण आणि निवासाची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे.
जालना शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत आहे. यामुळे येथे परप्रांतीय म्हणजेच बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथून जवळपास ७ ते ८ हजार कामगार विविध उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. त्यात विशेष करुन स्टील उद्योगात या कामगारांची संख्या अधिक आहे. जनता कर्फ्यू हा २२ मार्चला पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. त्याचवेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्रमुख उद्योजकांची बैठक बोलावून ३१ मार्चपर्यंत आपले उद्योग बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
या जिल्हाधिका-यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील सर्वच लहान मोठे असे शंभर पेक्षा अधिक उद्योग बंद ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. परंतु जनता कर्फ्यूमध्येच सर्व उद्योग बंद असल्याने अनेक कामगारांनी त्याचवेळी आपआपल्या गावी रवाना झाले. त्यामुळे जालन्यातील हा प्रश्न निकाली निघाला आहे.
परंतु सोमवारी आ. कैलास गोरंट्याल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जालना जिल्ह्यातील आंध्रप्रदेशमध्ये शेती कामासाठी गेलेले शेतमजूर हे पायी निघाली असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी लगेचच मजूराशी संपर्क साधून असे पायी येणे सोपे नसल्याचे सांगून तुमची सर्व व्यवस्था निजामाबादच्या मित्रांना सांगून करतो, असे सांगितले. त्यामुळे या कामगारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.