भोकरदन: संचारबंदीमुळे सलून व्यवसायावर गदा आली आहे. तसेच नागरिकांना दाढी व कटिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नसल्याने दानापूर येथील एका सलून चालकाने नेहमीच्या ग्राहकांसाठी एका शेतात आपला दाढी व कटिंगचा व्यवसाय थाटला आहे. यावेळी निर्जंतुकीकरणांचे सर्व उपाय करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सर्व सलुनची दुकाने गेल्या 20 मार्च पासून बंद आहेत. त्यामुळे केवळ सलुनच्या व्यवसायावरच उदरनिर्वाह असणाऱ्यांची कोंडी होऊन आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शिवाय नेहमीच्या ग्राहकांना नाराज सुध्दा करता येत नाही, जर नेहमीच्या ग्राहकांना अडचणीच्या वेळी दाढी कटिंग करून दिली नाही तर ते दुकान सुरू झाल्यावर दुसऱ्याच्या दुकानात जातील, पर्यायाने ग्राहक तुटेल ही भीती वेगळीच. म्हणून दानापूर येथील गजानन रामकृष्ण बोर्डे या तरुणाने मोजक्याच ग्राहकांना फोनवर वेळ आणि स्थळ सांगत सेवा सुरू केली आहे. शेतात जाऊन दाढी व कटिंग करताना निर्जंतुकीकरणासाठी सर्व प्रकारची सुरक्षा बाळगण्यात येत असल्याची माहिती बोर्डे यांनी दिली आहे.
माझ्या घरात पाच व्यक्ती आहेत, सर्वांचा उदरनिर्वाह सलूनवरच आहे. पंधरा दिवस झाले दुकान बंद असल्याने आर्थिक चणचण भासत आहे. यामुळे शेवटी नाईलाजाने सेवा परत सुरू करावी लागली. सेवा देण्यापूर्वी स्वतः साबणाने हात धुऊन घेतो व ग्राहकाला सुध्दा हात धुवायला लावून निर्जंतुकीकरणाची सर्व काळजी घेण्यात येते. - गजानन बोर्डे