जालना : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा पॉझिटेव्हि रूग्ण आढळला नसला तरी, संशयितांचा आकडा हा धास्तावणारा असून, आणखी काही अहवाल प्रयोगशाळेकडून अप्राप्त असल्याने अनेकांच्या ºहदयाचा ठोका चूकत असल्याचे दिसून आले.
जालना जिल्ह्यात पहिला संशयित १८ मार्चला आढळला होता. त्यानंतर १६ दिवसात संशयितांची संख्याही शुक्रवार पर्यंत १२६ वर पोचली होती. विशेष म्हणजे या १२६ पैकी अद्याप २३ अहवाल अप्राप्त असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत १२६ पैकी ९२ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
जालना जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा सामान्य रूग्णालय आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग डोळ्यात तेल घालून प्रचंड परिश्रम घेत आहे. त्यातच जालन्यात कोरोना संशयितांसाठी आता शंभर खाटांचे स्वतंत्र रूग्णालय उभारले जात आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात कोरोनाचे संकट आणखी गडद झाल्यास हे रूग्णालय महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे त्याच्या उभारणीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल तसेच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे हे जातीने लक्ष ठेवून आहेत.
आज घडीला दिल्लीतील संमेलनात सहभागी झालेल्या पैकी तीन जण जालन्यात आले आहेत. त्यांचे स्वॅब प्रयोशाळेकडे गुरूवारी रात्रीच पाठविण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळ पर्यंत काही अहवाल येणे शिल्लक असल्याचेही ते म्हणाले.
१०४ अहवाल निगेटीव्हएकूण जिल्हा रूग्णालयातील शुक्रवारी सायंकाळ पर्यंतची स्थितीची माहिती देण्यात आली. त्यानुसार एकूण १२६ संशयित येथील विलगीकरण कक्षात दाखल आहेत. त्यातील १०४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, उर्वरित अहवाल अद्याप औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडून अप्राप्त असल्याची माहिती दिली आहे.
आप-आपल्या घरात जवळपास १२ हजार पेक्षा अधिक विलगीकरणात राहत असल्याचे सांगण्यात आले. तर २०० पेक्षा अधिक जणांना शासकीय पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या विविध शाळा, संस्थांमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती दिली.