जालना : शहरातील दु:खीनगर भागातील एका ६५ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले होते. त्या महिलेच्या शिक्षिका असलेल्या मुलीच्या स्वॅबचा अहवाल बुधवारी निगेटीव्ह आला आहे. शिक्षिकेचा अहवाल निगेटीव्ह आल्याने रांजणी येथील क्वारंटाईनमध्ये असलेल्या १५०० जणांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
जुना जालना शहरातील दु:खीनगर भागातील एका महिलेने कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी ६ एप्रिल रोजी समोर आले होते. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्या महिलने उपचार घेतलेल्या दोन खाजगी रूग्णालयासह सरकारी रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच महिलेचे नातेवाईक असे जवळपास ५५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. पैकी खाजगी रूग्णालयातील कर्मचाºयांचा अहवाल मंगळवारी निगेटीव्ह आला आहे. तर रांजणी येथे शिक्षिका म्हणून काम करणाऱ्यया महिलेच्या मुलीच्या स्वॅबचा निगेटीव्ह अहवाल बुधवारी प्राप्त झाला आहे. तसेच इतर २५ जणांच्या स्वॅबचे अहवालही निगेटीव्ह आले आहेत.
शिक्षिकेच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्याने रांजणी येथील विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांनी मात्र सुटकेचा श्वास घेतला आहे. दरम्यान जुना जालना भागातील दु:खीनगर परिसर प्रशासनाने सील केला असून, प्रशासकीय टीमद्वारे घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे.