CoronaVirus : धक्कादायक ! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या वाहनात सापडल्या दारूच्या बाटल्या, पाच लाखाची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 03:46 PM2020-04-18T15:46:41+5:302020-04-18T15:47:34+5:30
वरूडी फाट्यावरील चेकपोस्टवर शनिवारी दुपारी वाहनांची तपासणी
जालना : जालना- औरंगाबाद महामार्गावरील वरूडी फाट्यावरील चेकपोस्टवर शनिवारी दुपारी वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांच्या वाहनात दोन दारूच्या बाटल्या आणि पाच लाखाहून अधिकची रोकड आढळून आली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्याच्य सीमा बंद करण्यात आल्या असून, चेकपोस्टवर पोलीस वाहनांची तपासणी करीत आहेत. जालना- औरंगाबाद महामार्गावरील वरूडी फाट्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना शनिवारी दुपारी औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांचे वाहन आले. त्यांच्या वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता आतमध्ये दोन दारूच्या बाटल्या आणि पाच लाखाहून अधिकची रक्कम आढळून आल्याचे बदनापूर पोलीस ठाण्याचे पोनि खेडेकर यांनी सांगितले. वाहनासह रक्कमेचा पंचनामा करण्यात आला असून, गिते यांची चौकशी सुरू असल्याचेही खेडेकर यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा बंदी असतानाही गिते हे इतकी मोठी रक्कम घेऊन जालन्याकडे का येत होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणात गुन्हाही दाखल झालेला नव्हता.