CoronaVirus : राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य वाटप करावे : रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 03:53 PM2020-04-04T15:53:08+5:302020-04-04T15:54:02+5:30
केंद्राकडून २० लाख मेट्रीक टन धान्य उपलब्ध
जालना : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिब जनतेला स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून राज्य सरकारने तीन महिन्यांच्या नियमित अन्नधान्याच्या साठ्यासह केंद्राकडून मिळणाऱ्या पाच किलो तांदळाचे वाटप करावे, अशी अपेक्षा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
दानवे यांनी शनिवारी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला. देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा उपलब्ध आहे. तो गोरगरीब जनतेला द्यावा, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्यांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यानुसार पंतप्रधान गरीब कल्याण योजना, पंतप्रधान अन्न योजना, पंतप्रधान कसान सन्मान निधी यासह अन्य माध्यमातून शेतकरी आणि गरिबांना मदत केली जात आहे. यासाठी केंद्र सरकारने एक लाख ७० हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे.
अंत्योदय योजना, प्राधान्य कुुटुंब योजना या अंतर्गत २ रूपये किलो गहू आणि ३ रूपये किलो तांदूळ हे नियमितपणे वितरित केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त तीन महिन्यांचे धान्य देण्यासाठी एफसीआय मार्फत राज्य सरकारकडे १२ लाख मेट्रीक टन गहू आणि ८ लाख मेट्रीक टन तांदूळ उपलब्ध करून दिला आहे. अन्न धान्य उपलब्ध असताना राज्य सरकार ३ महिन्यांचे धान्य का वाटत नाही ? हा संशोधनाचा विषय आहे. राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य द्यावे, यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेते संपर्कात असल्याचे दानवे म्हणाले. महाराष्ट्राला आणखी अन्नधान्य विशेष करून गहू देण्यासाठी हरियाणा आणि पंजाबमधून १६ मालगाड्यांमधून ५० हजार टन गहू उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले. देशात १.६२ लाख मेट्रीक टन धान्याचा साठा वेगवेगळ्या राज्यांना ४१० रेल्वेद्वारे पुरविला जात आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात अन्नधान्य असल्याने राज्य सरकारने तीन महिन्याचा साठा तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली. यावेळी आ. नारायण कुचे, भाजपाचे उपाध्यक्ष भास्कर दानवे यांची उपस्थिती होती.
लॉकडाऊनचे पालन व्हावे
परदेशातून आलेले नागरिक आणि दिल्ली येथील मरकजचे संमेलन यामुळे कोरोनाचा फैलाव झाला आहे. हा संसर्ग आणखी पसरू नये म्हणून प्रत्येकाने लॉकडाऊनचे पालन करावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री दानवे यांनी व्यक्त केली. रविवारी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार दिवे लावून एकोपा दाखविण्याचेजे आवाहन केले त्यात सहभागी होताना सुरक्षित अंतर ठेवावे, असेही ते म्हणाले.