मतमोजणी केंद्राची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:27 AM2019-03-15T00:27:29+5:302019-03-15T00:27:37+5:30
गुरूवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी औरंगाबाद मार्गावरील दावलवाडी परिसातील एका कंपनीत त्या केंद्राची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या नंतर तब्बल एक महिना इव्हीएम मशिनचा सांभाळ करावा लागणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी औरंगाबाद मार्गावरील दावलवाडी परिसातील एका कंपनीत ही मतमोजणी होणार असून, त्या केंद्राची पाहणी केली.
जालना लोकसभा मतदार संघात जवळपास १८ लाख मतदार आहेत. त्यांना सुरळीत मतदान करता यावे म्हणून २००० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी सर्व त्या सुविधा तयार करण्याचे निर्देश दिले असून, त्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच आता जिल्हा प्रशासनात झालेल्या बदल्यामुळे निवडणूक उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार हा जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांच्याकडे आला आहे.
जिल्ह्यात बेलेट युनिट जवळपास तीन हजार ६७० सीयु मशीन, २ हजार ५२ आणि व्हीव्हीपॅट दोन हजार २५७ मशीन आहेत. त्या सर्व मशिनची
तांत्रिक तपासणी ही, आॅक्टोबरमध्ये पूर्ण झाल्याने त्या आता जवळपास तयार आहेत. या मशिनची तपासणी करण्यायसाठी बंगळुरू येथील २३ इंजिनिअर्स आले होते. या मशिन हैदाराबाद येथून जालन्यात दाखल झाल्या आहेत. एकूणच ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी १५ हजार कर्मचारी लागणार असून, वेगवेगळ्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना चार टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
आज करण्यात आलेल्या पाहणीत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या समवेत अभियंते तसेच निवडणुक उपजिल्हाधिकारी राजू नंदकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थती होती. मतमोजणीची व्यवस्था अद्यायावत राहावी म्हणून एक स्वतंत्र नकाशा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नेमक्या वस्तू कुठे ठेवण्यात आल्या आहेत. याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.