दागिने लुटल्याचा बनाव करणाऱ्या मुनिमाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:56 AM2019-02-06T00:56:59+5:302019-02-06T00:57:10+5:30
साडेचार लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याचा बनाव करणाºया मुनिमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी बेड्या ठोकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : साडेचार लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याचा बनाव करणाºया मुनिमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी बेड्या ठोकल्या. पुंजाप्पा भगवानअप्पा दुकानदार (रा. अंबरवाडी ता. जिंतूर) असे मुनिमाचे नाव आहे.
सराफा व्यापारी शशिकांत शिवराजअप्पा बेंडके (रा. जिंतूर जि.परभणी) यांनी शनिवारी जालन्यात मुनीम पुंजाप्पा दुकानदार याला सोन्या- चांदीचे दागिने आणण्यासाठी पाठविले होते. जालन्यातील सुराणा ज्वेलर्स येथून १०० ग्रॅम सोने आणि पावणेतीन किलो चांदी असा ४ लाख ६१ हजार १८५ रुपयांच्या मुद्देमालाची मुनिमाने खरेदी केली होती. त्यानंतर मुनिमाने आॅटोरिक्षातून जात असताना चोरट्यांनी भरदिवसा सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेल्याचे सांगितले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेमुळे पोलिसात खळबळ उडाली होती. दरम्यान, पो. नि. राजेंद्रसिंह गौर यांना माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा मुनीम पुंजाप्पा दुकानदार याने केला. या माहितीवरुन मुनिमाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून साडेचार लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, सपोउपनि. कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, फुलसिंग गुसिंगे, सदाशिव राठोड आदींनी पार पाडली.