राजूरला भाविकांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:53 AM2018-08-01T00:53:24+5:302018-08-01T00:55:29+5:30
अंगारकी चतुर्थीनिमित्त जालना जिल्ह्यातील राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंगळवारी गर्दी केली होती. पावसाच्या उघडीपीमुळे देखील भाविकांच्या गर्दीत वाढ झाल्याचे दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : अंगारकी चतुर्थीनिमित्त जालना जिल्ह्यातील राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंगळवारी गर्दी केली होती. पावसाच्या उघडीपीमुळे देखील भाविकांच्या गर्दीत वाढ झाल्याचे दिसून आली.
गणपती दर्शनसाठी हजारो भाविकांचा पायी जथ्था सोमवारी रात्रीच दाखल झाले. दुपारपर्यंत गणेश भक्तांकडून देणगी स्वरूपात १२ लाख ५० हजार रूपये प्राप्त झाल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले. पायी वारी करणाऱ्या भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्था, संघटनांनी ठिकठिकाणी चहा, फराळ आणि आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था केली होती.
सोमवारी रात्रीच राजूरात यात्रेचे स्वरूप आले होेते. भाविकांची उसळलेली गर्दी लक्षात घेऊन गणेशभक्तांनी रात्री दहा वाजेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सोमवारी रात्री १२ वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, आ. नारायण कुचे व गणपती संस्थानच्या अध्यक्षा तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांच्याहस्ते महाआरती होऊन भाविकांकरिता दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
सोमवारी रात्री सुरू झालेल्या गर्दीचा ओघ मंगळवारी दिवसभर सुरू होता. सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन, पंढरपूरची यात्रा याचा राजूरेश्वराच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या गर्दीवर परिणाम होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, भाविकांच्या गर्दीने सर्व अंदाज फोल ठरले. सध्या शेतकºयांना शेती कामातून उसंत असून पावसाने उघडीप दिल्याने भाविकांचा जनसागर उसळला होता.
मंगळवारी दिवसभर चौहोबाजूंनी भाविकांच्या पायी दिंडी टाळमृदंगाच्या गजरात गणरायाचा जयघोष करीत राजूरात दाखल होत होत्या. तसेच मंदिर परिसरात महिला व पुरूषांच्या स्वतंत्र रांगा, पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था करण्यात आली होती. संस्थानने भाविकांसाठी कठडे उभारून सुरळीत दर्शनाची व्यवस्था केली.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मंदिर परिसरात फिरते वैद्यकीय पथक तैनात केले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तसेच सेवेकºयांनी दिवसभर योगदान दिले. सांयकाळपर्यंत किरकोळ प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी सांगीतले.यावेळी उपसभापती गजानन नागवे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, शिवाजी पुंगळे, माजी जि. प. सदस्य रामेश्वर सोनवणे, गणेश साबळे, प्रशांत दानवे, श्रीरामपंच पुंगळे, जगन्नाथ थोटे, भगवान नागवे, मोहिनीराज मापारी, आप्पासाहेब पुंगळे, मुकेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
वराडे दाम्पत्याला मान
अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनरांगेत पहिल्या दर्शनाचा मान सोनाजी संतोष वराडे व त्यांच्या पत्नी शिवनंदा (रा.सारोळा, ता.सिल्लोड) यांना मिळाला. वराडे दाम्पत्यांचा खा. रावसाहेब दानवे, आ. नारायण कुचे तसेच संस्थानच्या अध्यक्षा योगिता कोल्हे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.