संतांच्या प्रेरणेमुळेच संस्कृती टिकून- सुरेश जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 12:53 AM2019-12-08T00:53:02+5:302019-12-08T00:53:32+5:30
हल्ले आणि संकटे येऊनही त्या- त्या काळातील संत महात्म्यांनी जी प्रेरणा समाजजागृतीसाठी केली त्यामुळेच आज आपण टिकून असल्याचे मत सुरेश जोशी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भारतावर अनेक आक्रमणे झाली. त्यामध्ये भारतीय संस्कृती नष्ट व्हायला हवी होती. परंतु, असे हल्ले आणि संकटे येऊनही त्या- त्या काळातील संत महात्म्यांनी जी प्रेरणा समाजजागृतीसाठी केली त्यामुळेच आज आपण टिकून असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह सुरेश जोशी यांनी व्यक्त केले.
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे शनिवारी जोशी यांच्यासह काडीतीर्थेश्वर महाराजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पुढे बोलताना जोशी म्हणाले, समर्थ रामदास, सम्राट अशोक, आर्य चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी त्या काळात जी अध्यात्मिक शक्ती समाजाला दिली ती खूप मोठी होती. तिचे जपण्याचे काम चैतन्य पिठाकडून हाती घेण्यात आल्याने आपण समाधानी आहोत. यात सर्व समाज बांधवांनी हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आपली संस्कृती किती जुनी आहे, याचे उदाहरण त्यांनी लोणार येथील प्राचीन मंदिरांचे देऊन विशद केले. यावेळी विनायक देशपांडे, विनायक दसरे, चैतन्य ज्ञानपीठाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कळमळकर, समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन समितीचे अध्यक्ष विनायक देहेडकर, महेश कवठेकर, सूर्यकांत कुलकर्णी, मोरे आदी उपस्थित होते.