नीलगायींचा हैदोस; द्राक्ष पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:29 AM2019-07-01T00:29:02+5:302019-07-01T00:30:05+5:30
बदनापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याने हैदोस घातला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी त्रस्त झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बदनापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याने हैदोस घातला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून, या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील काजळा, पानखेडा, बुटेगाव, घोटण, सायगाव, डोंगरगाव, रांजणगाव, कुंबेफळ, गोल्हा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बागा जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. तर दुसरीकडे रोही हे प्राणी या बागांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
बदनापूर परिसरातील माळरानात वनविभागातर्फे वन्यप्राण्यांसाठी पाणवाठे तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. वन विभागाच्यावतीने या प्राण्यांचा बंदोबस्तही करण्यात येत नाही.
खर्च निघणे मुश्कील
परिसरातील शेतक-यांनी लाखो रुपये खर्च करुन द्राक्ष पिकाची लागवड केली आहे. दुुष्काळी परिस्थितीत पाणी नसतानाही विकतचे पाणी घेऊन फळबागा जगविल्या.
यासाठी हजारो रुपये खर्च केले. परंतु, रोही झाडांची नासधूस करीत असल्याने शेतक-यांनी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.