दानवे- खोतकरांच्या आधी दंडबैठका; आता आणा-भाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:46 AM2019-03-28T00:46:06+5:302019-03-28T00:46:25+5:30
एकमेकांविरुध्द दंड थोपटून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांनी जालना लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापवले होते. परंतु नंतर ‘मातोश्री ’च्या आदेशानुसार खोतकरांनी तलवार म्यान केली. यानंतर हे दोन्ही नेते जाहीररीत्या प्रथमच बुधवारी एकमेकांसोबत दिसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एकमेकांविरुध्द दंड थोपटून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांनी जालना लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापवले होते. परंतु नंतर ‘मातोश्री ’च्या आदेशानुसार खोतकरांनी तलवार म्यान केली. यानंतर हे दोन्ही नेते जाहीररीत्या प्रथमच बुधवारी एकमेकांसोबत दिसले. त्यांनी दोस्ती निभावण्याच्या आणा- भाकाही घेतल्या. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचीही उपस्थिती यावेळी लक्ष वेधून घेत होती.
प्रारंभी शिवसैनिकांची बैठक खोतकरांच्या निवासस्थानी तीन तास चालली. त्याच वेळेस भाजपची बैठक नगरसेवक भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नंतर दानवे खोतकरांच्या घरी गेले. प्रारंभी खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांची बंदव्दार अर्धा तास चर्चा झाली. नंतर तिन्ही नेत्यांनी बाहेर शिवसैनिकांसमोर येऊन ‘आतील’ काही घडामोडींची माहिती दिली. झाले गेले विसरून जाऊन यापुढे तरी दोन्ही पक्षांनी एकोप्याने काम करावे, असा त्यांचा एकंदरीत सूर होता. या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे भाजप- आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया या निमित्ताने उंचावल्या होत्या.
हे तर जावा- जावांचे रुसवे फुगवे !
दानवे आणि खोतकर यांचा वाद म्हणजे घरातील जावा-जावांचे वाद होते. मोठी जाऊ आणि तिचा नवरा हा घरातील कर्ता पुरूष असतो. तसे दानवे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे वागणे होते. साहजिकच लहान जाऊ अर्थात शिवसेना यामुळे मेटाकुटीस आली होती. ते थांबविण्याची गरज अंबेकर यांनी व्यक्त केली. खोतकर यांनी देखील अशीच री ओढली. दानवे यांनी यापुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असे होणार नाही, अशी ग्वाही दिली.