लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : बुलडाणा तालुक्यातील गिरडा परिसरात ८० ते ९० कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात बुलडाणा पोलिसांनी भोकरदन नगरपरिषदेच्या दोन कंत्राटी कामगारांसह चार जणाना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नेमके कुत्रे कोणी आणून टाकले, यांचा शोध पोलीस घेत आहेत.गिरडा शिवारातील सावळत बादाऱ्याकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला ८ सप्टेंबर रोजी ८० ते ९० कुत्रे मृतावस्थेत पडले होते. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी सुटली. त्यामुळे नागरिकांनी पाहणी करून वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी के.एऩ तराळ यांच्या तक्रारी वरून अज्ञात व्यक्ती विरूध्द बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम़एऩ सातदिवे, पोलीस कर्मचारी शरद चोपडे, संजय वराडे यांचे पथक ११ सप्टेंबर रोजी भोकरदन येथे दाखल झाले. नगर परिषदेने कुत्रे पकडण्याची हाती घेतलेल्या मोहिमेची माहिती घेऊन चौकशीसाठी कंत्राटी कामगारांसह चौघांना ताब्यात घेतले आहे. शिवाय सातदिवे यांनी मुख्याधिकारी अमित सोंडगे, कर्मचारी वामन आडे यांच्याशी चर्चा केली असून, हे कुत्रे नेमके कोणी आणून टाकले, याचा शोध बुलडाणा पोलीस घेत आहेत़दरम्यान, कुत्रे चावल्यानंतर जी रेबीज होऊ नये म्हणून लस अनेक शासकीय रूग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्याने रूग्णांचे मोठे हाल होत असल्याचे सांगण्यात आले.कुत्र्यांचा सुळसुळाटभोकरदन शहरात गेल्या एक महिन्यापासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. नेमक्या याचा मोहिमेच्या आधारे बुलडाणा पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलेआहे़पोलीस निरीक्षक एम़ एऩ सातदिवे यांनी सांगितले की, आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८० ते ९० मयत झालेले कुत्रे आढळून आले आहेत. त्या संबंधी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे कुत्रे भोकरदन येथून आणून टाकल्याची प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सातदिवे म्हणाले.मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे म्हणाले, अज्ञात व्यक्तीने शहरात कुत्रे आणून सोडले होते. नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आम्ही कुत्रे पकडून ते इतरत्र नेऊन सोडले आहेत. गिरडा येथील मृत कुत्र्यांचा व भोकरदन नगर परिषदेचा काहीही संबंध नाही.
कुत्र्यांचा मृत्यू; चौघे पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 1:02 AM