कोटीचे लक्ष्य निर्धारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:14 AM2019-07-01T01:14:14+5:302019-07-01T01:14:37+5:30

शहरी, ग्रामीण भागात आजपासून वृक्षारोपणाचा ‘महायज्ञ’ सुरू होणार आहे.

Define the target of the crores | कोटीचे लक्ष्य निर्धारित

कोटीचे लक्ष्य निर्धारित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात आजपासून वृक्षारोपणाचा ‘महायज्ञ’ सुरू होणार आहे. जिल्ह्यात तब्बल १ कोटी ५ लाख रोपांची लागवड होणार असून, यासाठी शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.
वृक्षतोडीमुळे जिल्ह्यासह मराठवाड्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पर्यावरणाचा ढासाळलेला समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संगोपन ही काळाची गरज बनली आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलत वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. जालना जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रानुसार ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. परंतू हे प्रमाण केवळ १.२९ टक्के एवढेच आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी कसोसीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासनाच्या वतीने जिल्ह्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाकडून जिल्ह्याला १ कोटी ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट सध्य करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनिकरण, रेशीम विभाग, जिल्हा परिषद, महसूल विभाग, पोलीस यंत्रणेसह सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फत नियोजन करण्यात आले आहे.
वृक्षलागवड आणि संगोपनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वनविभागाच्या जिल्ह्यात २२ रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमध्ये २८ लाख रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आली आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीत कोठे टँकरद्वारे तर कोठे उपलब्ध स्त्रोतातून पाणी देऊन ही रोपे जगविण्यात आली आहेत. निम, चिंच, बांबूसह इतर विविध प्रजातीची रोपे तयार आहेत. उद्दिष्ट पूर्तीसाठी लागणारी ५ लाख रोपे वगळता इतर रोपांचे सर्वसामान्यांना वाटप केले जाणार आहे. संस्था, संघटना, शाळांसह इतरांकडून येणा-या मागणीनुसार वनविभागाकडून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. तर इतर विभागांकडूनही वृक्षारोपण मोहिमेची जोरदार
तयारी करण्यात आलेली आहे.
वनरक्षकांसह वनमजूर राहणार कार्यरत
वनविभागाला जिल्ह्यातील वनक्षेत्रात ५ लाख रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर वनविभागाकडे २८ लाख रोपे तयार आहेत. दिलेल्या उद्दिष्टानुसार रोपांची लागवड करण्यासाठी १३ वनरक्षक, ४० वनमजुरांसह त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील मजुरांची मदत घेतली जाणार आहे.
ग्रामपंचायतीला होणार ३ हजार रोपांचा पुरवठा
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस ३ हजार २०० रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकच्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कन्या वनसमृद्धी योजनाही जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
इतर विभागही सक्रिय
वृक्षारोपण मोहिमेसाठी वनविभागाने २८ लाख रोपे तयार ठेवली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने जवळपास ५० लाख, रेशीम विभागाने जवळपास २५ लाख रोपे तयार ठेवली आहेत. तर इतर शासकीय विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांमध्येही लागवडीसाठी रोपे तयार ठेवण्यात आली आहे.

Web Title: Define the target of the crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.