लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लक्ष्मणानं रेषा ओढून सीतेला ती रेषा ओलांडू नका म्हणून सांगितलं. परंतु सीतेनं ते ऐकलं का ? अर्थात लक्ष्मणरेषा ओलांडण्यात सीतेचा हेतू शुध्द आणि चांगला असला तरी विनाश झालाच ना! मनुष्यप्राणी कोणत्याही हेतूने का होईना मर्यादा ओलांडल्याशिवाय राहत नाही म्हणूनच त्याला विनाशाला सामोरे जावे लागते. सांगायचं तात्पर्य असं की कुणीही मर्यादा ओलांडू नये. मग या ठिकाणी तुमचा हेतू कसा आणि काय आहे, याला काहीही अर्थ नसतो, असा हितोपदेश रामदास महाराज आचार्य यांनी येथे बोलताना दिला.सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्थापित श्रीराम संस्थान आनंदवाडी जुना जालना येथे श्रीराम जन्म, नवरात्रोत्सव सोहळा आणि संगीतमय रामायण कथेचे निरुपण करताना ते बोलत होते. शुक्रवारी प्रात:कालामध्ये स्नेहल नेवासकर यांचे तर सायंकाळी डॉ. पराग चौधरी यांचे गीतगायन होणार आहे.कालच्या कथेतील थोडक्यात परामर्श घेऊन रामदास महाराज आचार्य म्हणाले की, जानकीची सुरक्षा ही लक्ष्मणाची जबाबदारी होती. ती जबाबदारी चुकू नये म्हणूनच लक्ष्मणाने बाहेर जाण्यापूर्वी पर्णकुटीजवळ लक्ष्मणरेषा ओढून ती न ओलांडण्याची सूचना सीतेला केली होती. कारण काहीही घडू शकते याची कल्पना कदाचित लक्ष्मणाला आली असावी किंवा सीतेच्या सुरक्षेसाठी लक्ष्मणाने रेषेचा पर्याय निवडला असेल. परंतु एवढे सांगूनही जे घडायचे तेच घडले. म्हणून रावणाने सीतेच्या अपहरणाचा पर्याय निवडला अन् त्यातूनच त्याच्या पतनाचा कार्यारंभ झाला असे आचार्य म्हणाले. कार्यक्रमास परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सायंकाळी कीर्तन, भजन होत आहे.
मर्यादा ओलांडली की विनाश अटळ - रामदास आचार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:33 AM