बाजार वाहेगावचा केवळ विकास आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:58 AM2018-04-08T00:58:15+5:302018-04-08T00:58:15+5:30
बाजार वाहेगाव या गावाची आमदार आदर्शग्राम योजनेत निवड झालेली आहे. आ.नारायण कुचे यांनी दत्तक घेतलेल्या या गावात विकास आराखड्याच्या पलिकडे काहीही होऊ शकलेले नाही.
दिलीप सारडा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील बाजार वाहेगाव या गावाची आमदार आदर्शग्राम योजनेत निवड झालेली आहे. आ.नारायण कुचे यांनी दत्तक घेतलेल्या या गावात विकास आराखड्याच्या पलिकडे काहीही होऊ शकलेले नाही. त्यामुळे या राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी हे गाव आदर्श ग्राम होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील बाजार वाहेगाव या गावची आदर्श आमदार ग्राम योजनेंतर्गत १९ डिसेंबर २०१५ रोजी निवड करण्यात आली. २ हजार ४२४ लोकसंख्या असलेल्या या गावात योजनेंंतर्गत प्रास्तावित कामांना शासनाकडुन मंजुरीची अपेक्षा आहे. येथील बनविलेल्या आराखड्यानुसार या गावात भूमिगत नाली नाही, एका समाजमंदिराची आवश्यकता आहे, स्मशानभुमीला जागा आहे पण शेड नाही, धोबी घाट नाही, ४० कचराकुंडी प्रस्तावित, शोषखड्डे १५० प्रस्तावित, घंटागाडी प्रस्तावित, नादुरूस्त सहा वर्गखोल्या पाडणे, पाच नवीन बांधकाम करणे, शाळेला संरक्षण भिंत आवश्यक, सर्व वर्गखोल्यांना विद्युत पुरवठा आवश्यक, सात अंतर्गत रस्ते व इतर आठ सुविधा करण्याची गरज आहे. तसेच नदी खोलीकरण करणे व गाळ काढणे, तळ्यातील गाळ काढणे, सिमेंट नाला बांध करणे, नवीन शेततळे मंजूर करणे आदी भविष्यातील कामांची आवश्यकता असून, ही कामे प्रस्तावित करून त्याबाबतचा आराखडा २३ जाने २०१७ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे़ याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. त्यामुळे राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी हे गाव आदर्श ग्राम म्हणून उदयास येण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.