लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : विदेशातून आलेल्या व्यक्तीला जालना जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी शहागड येथील रूग्णवाहिकेच्या चालकाने नकार दिला. त्यामुळे संबंधित व्यक्तीला पाच तास वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात बसून राहावे लागल्याचा प्रकार शनिवारी घडला. वडीगोद्री केंद्राची रूग्णवाहिका आल्यानंतर त्या रूग्णाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.मुंबई, पुण्यासारख्या शहरातूनच नव्हे तर विदेशातून आलेल्या नागरिकांची दक्षता म्हणून कोरोना तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गावपातळीवर अशा व्यक्तींची माहिती संकलित केली जात आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणादरम्यान वडीगोद्री परिसरात एक व्यक्ती विदेशातून आल्याचे समोर आले होते. त्या व्यक्तीची २८ मार्च रोजी वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्याला जालना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. परंतु, त्या व्यक्तीने डॉ. सुशील जावळे यांनी दिलेले पत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना न दाखविता ‘मी मुंबईवरून आलो’ अशी माहिती देत उपचार घेतले. तेथे त्याला होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.डॉ. जावळे यांनी दूरध्वनीवरून संबंधित रूग्णाबाबत माहिती घेतल्यानंतर त्याने खोटी माहिती दिल्याचे लक्षात आले. त्यानंतर डॉ. जावळे यांनी तातडीने ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास रोडे यांना दिली. डॉ. रोडे यांनी सपोनि हनुमंत वारे यांना माहिती देऊन त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सांगितले. सपोनि वारे, डॉ. जावळे यांनी शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्या व्यक्तीला वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका आॅक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी जालना येथे गेली होती. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी शहागड येथील डॉ. अविनाश देशमुख, चालक भरत वाघुम्ब्रे यांना रुग्णवाहिका घेऊन त्या व्यक्तीला जालना येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. परंतु, चालकाने येण्यास स्पष्ट नकार दिला. पाच तासानंतर वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका आल्यानंतर त्या रूग्णाला जालना येथे नेण्यात आले. दरम्यान, कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात शासकीय कर्तव्यास नकार देणा-या चालकाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोना संशयिताची रुग्णवाहिकेसाठी गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:16 AM