विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत चालला आहे. गेल्या तीन महिन्यात मोकाट कुत्र्यांनी जालना जिल्हाभरात दोन हजार ८०० जणांना चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांना लस देण्यात आली असल्याचे घाटी प्रशासन व आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्रे शहरातील गांधी चमन, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, औरंगाबाद चौफुली इ. प्रमुख परिसरात रात्री टोळक्याने सर्रास फिरतात.दुचाकी व पादचारी व्यक्ती येताच मोकाट कुत्रे पाठलाग करतात. हीच परिस्थिती ग्रामीण भागात देखील आहे. नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत ग्रामीण भागातील दोन हजार १६५ तर जालना शहरात ६३५ अशा एकूण दोन हजार ८०० जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. तसेच या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता कुत्र्यांकडून नागरिकांवर होणारे हल्ले वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगरपरिषदेने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे. गेल्या काही महिन्यांत ग्रामीण भागासह शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा मुख्य रस्त्यावरून ये - जा करताना वाहनचालकास व पादचाऱ्यांना कुत्रे चावा घेतात. कुत्र्यांनी चावा घेतल्याने एक म्हैस दगावल्याची घटना कुंभारपिंपळगाव येथे घडली आहे.
तीन महिन्यात २८०० जणांना कुत्र्यांचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 1:23 AM